ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘मिशन रायझिंग फ्लॉवर’ शिबिर उत्साहात

खेड (प्रतिनिधी) : मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) येथे खेड पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी, १ सप्टेंबर २०२६ रोजी ‘मिशन रायझिंग फ्लॉवर’ या उपक्रमांतर्गत मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले. इयत्ता नववी ते अकरावीतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या वेळी विद्यार्थ्यांना सुरक्षित बालपण, सजग विद्यार्थी आणि सक्षम भविष्य या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या सामाजिक परिस्थितीत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहणे, कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी योग्य व्यक्तीशी संपर्क साधणे तसेच कायदे व हक्कांची माहिती करून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक भान आणि सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. उमेश कुमार बागल यांनी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समेल सुर्वे तसेच उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पोलीस उपनिरीक्षक समेल सुर्वे, हेड कॉन्स्टेबल चंदू कोकतरे आणि हेड कॉन्स्टेबल रोहित जोयशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे, डॉ. उमेश कुमार बागल यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कांबळे यांनी केले. तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले.
‘मिशन रायझिंग फ्लॉवर’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षितता, जबाबदारी आणि सजगतेचा संदेश मिळाल्याने हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरला.