“14 वर्षांचा वनवास अखेर संपला”; खेडमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या भावना

खेड नगरपरिषदेत महायुतीचा ऐतिहासिक क्लीन स्वीप, 21-0 ने दणदणीत विजय; माधवी बुटाला नगराध्यक्षा

खेड (प्रतिनिधी) – तब्बल 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर खेड नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता प्रस्थापित झाली असून, शिवसेना-भाजप महायुतीने 21 पैकी 21 जागांवर विजय मिळवत विरोधकांचा सपशेल पराभव केला आहे. 21-0 असा एकतर्फी व ऐतिहासिक निकाल लागल्याने खेडच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे.
2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर आज निकाल जाहीर होताच महायुतीने सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. या निकालामुळे “14 वर्षांचा वनवास अखेर संपला” अशी भावना खेडमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने ही निवडणूक लढवली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आणि भाजपने एकसंधपणे प्रचार करत मतदारांचा विश्वास संपादन केला. या निवडणुकीत शिवसेनेचे 17 उमेदवार तर भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले असून, अपक्ष उमेदवारांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट लढतीत शिंदे गटाच्या माधवी बुटाला यांनी 5306 मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला. उबाठा गटाच्या सपना कानडे यांना 3195 मते मिळाली, तर वंचितच्या सीमा जाधव यांना 99 मतांवर समाधान मानावे लागले. माधवी बुटाला यांच्या विजयामुळे त्या खेडच्या नगराध्यक्षा पदावर विराजमान होणार आहेत.
प्रभागनिहाय मतमोजणीत महायुतीच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. अनेक प्रभागांत विरोधकांना दोनशे ते चारशे मतांवरच रोखले गेले, तर काही ठिकाणी तब्बल 700 ते 900 पेक्षा अधिक मते मिळवत महायुतीच्या उमेदवारांनी वर्चस्व सिद्ध केले. या निकालातून खेडच्या जनतेने विकासाभिमुख नेतृत्वावर ठाम विश्वास दाखवला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घवघवीत विजयानंतर खेड शहरात जल्लोषाचे वातावरण असून, कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात विजय साजरा केला. महायुतीच्या नेत्यांनी हा विजय खेडच्या सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा असल्याचे सांगत पुढील पाच वर्षांत शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले आहे.
21-0 असा निकाल खेड नगरपरिषदेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणारा ठरला असून, महायुतीच्या एकसंध नेतृत्वावर जनतेचा कौल आणि विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.