गणेशोत्सव तोंडावर तरी जूनपासून मानधन रखडले; निवेदन सादर
गुहागर प्रतिनिधी:
ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध ऑनलाइन सेवा आणि प्रशासकीय कामकाजाचा परिचालकांच्या मानधनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. डिजिटल भार सांभाळणाऱ्या संगणक परिचालक आर्थिक अडचणीत सापडले असून, जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे थकीत मानधन तातडीने खात्यावर जमा करावे, अशी मागणी रत्नागिरी तालुका संगणक परिचालक संघटनेने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत तसेच राजापूरचे आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांच्या मानधनासाठी शासनाने १६ व्या वित्त आयोगातून स्वतंत्र तरतूद केलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच मानधन कोणत्या निधीतून आणि कोणत्या पद्धतीने अदा करायचे, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना नसल्याने मानधन रखडल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. दैनंदिन ग्रामपंचायतींच्या कामकाजात संगणक परिचालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
विविध ऑनलाइन सेवा, शासकीय नोंदी, अर्ज प्रक्रिया तसेच प्रशासकीय कामकाजात ते सातत्याने योगदान देत असतात. मात्र, जबाबदारीने काम करूनही वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. निवेदन देताना रत्नागिरी जिल्हा संगणक परिचालक संघटनेचे संस्थापक तथा जिल्हाध्यक्ष हरीश वेदरे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष समीर गोताड, कार्याध्यक्ष आसिफ नाकाडे, सचिव भूषण सुर्वे, खजिनदार नीलेश शिंदे, संपर्कप्रमुख वैभव गुरव, किरण कुळ्ये, माजी लांजा तालुकाध्यक्ष संतोष कांबळे आणि संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रवीण यादव उपस्थित होते.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना सणासुदीची खरेदी, घरगुती खर्च, मुलांचे शैक्षणिक खर्च आणि अन्य अत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला आर्थिक नियोजन करावे लागते. अशा परिस्थितीत तीन महिन्यांचे मानधन थकीत राहिल्याने संगणक परिचालकांसमोर मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे थकीत मानधन अदा करून संगणक परिचालकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी संघटनेने केली आहे.













