डाएटचे प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर यांच्या हस्ते शिष्यवृत्ती मार्गदर्शक राजेश भागणे यांचा सत्कार

खेड (प्रतिनिधी) : इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत साखरोली मोरेवाडी शाळेने उल्लेखनीय यश संपादन करत एकूण सात विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळवून दिले. या यशामध्ये मोलाचे मार्गदर्शन करणारे शिक्षक व शिष्यवृत्ती मार्गदर्शक राजेश रघुनाथ भागणे यांचा रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
साखरोली मोरेवाडी शाळेतील विद्यार्थी प्रणय कांबळे याने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवत राज्यात १३ वा क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीसह शाळेतील तब्बल सात विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. ग्रामीण भागातील शाळेने मिळवलेल्या या यशामुळे शाळेचे नाव शैक्षणिक क्षेत्रात अधोरेखित झाले आहे.
या यशाची दखल घेत डाएटचे प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर यांनी प्रत्यक्ष साखरोली मोरेवाडी शाळेला भेट देऊन शिक्षक राजेश भागणे यांचा सन्मान केला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश मोरे, उपाध्यक्षा मीनाक्षी भावे, शिक्षण विस्ताराधिकारी संतोष भोसले, केंद्रप्रमुख प्रभाकर कोळेकर, अनिल यादव, अमोल सकपाळ, कृष्णा गंभीरे तसेच शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर यांनी शिक्षक राजेश भागणे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शाळेतील इतर शिक्षकांनी दिलेली मोलाची साथ आणि विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करून मिळविलेले यश याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवलकर यांनी भविष्यातही विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचे आवाहन केले. अभ्यासाचे नियोजन, सातत्य, सराव आणि योग्य मार्गदर्शन यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला मोठे यश मिळविता येते, असे त्यांनी सांगितले. शिष्यवृत्ती परीक्षेतील यश हे विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र ही गुणवत्ता ओळखून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारा, त्यांच्यासाठी मेहनत घेणारा आणि सातत्याने मार्गदर्शन करणारा शिक्षक त्यांना लाभणे आवश्यक आहे, असे मत प्राचार्य शिवलकर यांनी व्यक्त केले. साखरोली मोरेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिष्यवृत्ती परीक्षेत सात विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळवून देणारे शिक्षक राजेश भागणे यांच्या कार्याचे यावेळी उपस्थितांनी कौतुक केले. या यशामुळे साखरोली मोरेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांमध्येही स्पर्धा परीक्षांबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून, आगामी काळात शाळेकडून आणखी गुणवंत विद्यार्थी घडविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.