खेड (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी बस सेवा अनियमित वेळेत चालत असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करत भारतीय जनता पार्टी खेडतर्फे आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
खेड तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रामुख्याने एसटी बस सेवाच एकमेव आधार आहे. मात्र बसमधून उतरल्यावरही विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीटर अंतर डोंगरातून पायी जावे लागते. अशा परिस्थितीत गेल्या काही महिन्यांपासून खेड आगारातून सुटणाऱ्या बसेस अनियमित वेळेत धावत असून अनेक वेळा त्या अचानक रद्द केल्या जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
बस रद्द किंवा उशिरा येण्याबाबत कोणतीही पूर्वसूचना शाळा प्रशासन, सरपंच किंवा पोलीस पाटील यांच्यामार्फत गावापर्यंत पोहोचवली जात नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच आगाराचा दूरध्वनी क्रमांक बहुतेक वेळा उपलब्ध नसतो किंवा व्यस्त असल्याचे दिसते, तर संपर्क साधल्यास कर्मचारी कमी आहेत किंवा बसेस खराब आहेत अशी कारणे दिली जात असल्याचेही सांगण्यात आले.
विशेषतः संध्याकाळच्या वेळेत बसेस उशिरा येत असल्याने विद्यार्थीनींना अंधारात घरी जावे लागत असून यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. काही अप्रिय घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून बस सेवा नियमित करण्यात यावी तसेच शटल सेवेसाठी स्वतंत्र बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीम भाई सहिबोले, नगरसेविका वैभवी खेडेकर, माजी नगरसेविका आशाताई सनगरे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, शशांक सिनकर, राधेश्याम वर्मा, सिद्धेश पाटणे, राहूल पाटणे, विजय गुप्ता तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












