रविवारी राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीचे आयोजन

राजापूर (वार्ताहर): राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, राजापूर या संस्थेची २५ वी वार्षिक अधिमंडळाची बैठक रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक ‘नगर वाचनालय राजापूर’ येथे पतसंस्थेच्या माननीय अध्यक्षा सौ. शितल सुनिल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
या वार्षिक बैठकीमध्ये संस्थेच्या वतीने अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा आणि निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुढील विषयांचा समावेश आहे. त्यामध्ये मागील वार्षिक बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करणे. ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचे ताळेबंद, नफा-तोटा पत्रक आणि लेखापरीक्षण अहवाल मंजूर करणे. आर्थिक वर्ष २०२५-२०२६ च्या नफा वाटणीस मंजुरी देणे आणि लाभांश जाहीर करणे. वर्ष २०२६-२०२७ सालाकरिता वार्षिक अंदाजपत्रकाला मंजुरी देणे. संचालक व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जांची माहिती देणे. आगामी आर्थिक वर्षासाठी वैधानिक व अंतर्गत लेखापरीक्षकांची नेमणूक करणे आणि त्यांची मानधने निश्चित करणे आदी विविध विषयांवर बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
तरी यावेळी पतसंस्थेच्या सर्व सभासदांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन सचिव सौ. प्रेरणा प्रकाश अमरे यांनी केले आहे.