आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध; ७ सप्टेंबरला लोकार्पण सोहळा
स्वप्निल कदम-कुडाळ :
कुडाळ नगरपंचायत हद्दीतील भंगसाळ नदी बंधाऱ्याजवळ गणेश घाटाचे बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून, या महत्त्वपूर्ण विकासकामामुळे कुडाळ शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. नवीन नगरपंचायत सहाय्य अनुदान व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला असून, त्यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले आहे.
या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भंगसाळ नदी बंधाऱ्याजवळ, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या कामाचे लोकार्पण होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी लोकसभा सदस्य नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरें, प्रमोद जठार, दीपक केसरकर व पंचायत समिती कुडाळ सभापती मिलिंद नाईक, तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक डॉ. प्रजा मनोहर, पर्यटन विभागाच्या प्रादेशिक कार्यालय कोकण विभागाच्या उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर, जिल्हा सहआयुक्त विनायक औंधकर, कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे तसेच मुख्याधिकारी खंडू पवळ यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गणेश घाटाच्या बांधकामासोबतच नदीकाठच्या परिसराचे आकर्षक पद्धतीने सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना एक सुंदर, सुरक्षित व रमणीय सार्वजनिक ठिकाण उपलब्ध होणार आहे. तसेच या परिसराच्या विकासामुळे कुडाळ शहराच्या पर्यटन क्षमतेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
नदीकाठच्या परिसरात स्वच्छ, सुंदर व रमणीय वातावरण निर्माण करण्याबरोबरच शहराच्या पर्यटन विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. भविष्यात कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
कुडाळ शहराच्या विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी केले आहे.












