रिक्षांना सीएनजी पुरवठा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालक संघटना आक्रमक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा बंद करू नये
 उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरातील शिवाजीनगर येथे असलेल्या महानगर गॅस स्टेशनमधून येत्या १० सप्टेंबर २०२६ पासून रिक्षा व्यावसायिकांना सीएनजी गॅसचा पुरवठा बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर चिपळूण तालुका प्रवासी रिक्षा चालक-मालक संघटना आक्रमक झाली आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत असताना वाहतुकीवरील ताण वाढणार असल्याने रिक्षाचालकांना गॅस पुरवठा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
याबाबत संघटनेच्या वतीने चिपळूणचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शासनाने हवेचे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने सीएनजी वाहनांना मान्यता दिली असून, पर्यावरणपूरक इंधनाचा वापर करून व्यवसाय करण्याचा कायदेशीर अधिकार रिक्षाचालकांना आहे. रिक्षाचालक हे सीएनजी खरेदी करताना ग्राहक असल्याने त्यांना नियमित व योग्य प्रकारे सेवा मिळण्याचा अधिकार असल्याचे संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, शिवाजीनगर येथील महानगर गॅस स्टेशनमधून १० सप्टेंबरपासून रिक्षा व्यावसायिकांना गॅस देणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा निर्णय रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम करणारा असून ग्राहकांच्या हक्कांचेही उल्लंघन करणारा असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. गणेशोत्सवासाठी पुढील काही दिवसांत कोकणात लाखो चाकरमानी दाखल होणार आहेत. या काळात रस्ते वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होतो. अशा परिस्थितीत रिक्षा व्यवसायिकांना सीएनजी पुरवठा बंद झाल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून शिवाजीनगर येथील संबंधित गॅस स्टेशनमध्ये रिक्षाचालकांना नियमित आणि योग्य दरात सीएनजी उपलब्ध करून द्यावा, तसेच गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही परिस्थितीत गॅस पुरवठा बंद होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी चिपळूण तालुका प्रवासी रिक्षा चालक-मालक संघटनेने केली आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात संबंधित गॅस स्टेशनमधून रिक्षा व्यावसायिकांना सीएनजी वितरण बंद करण्यात आल्यास सर्व रिक्षा व्यावसायिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. अशा परिस्थितीत निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी संबंधित गॅस स्टेशनच्या व्यवस्थापनाची राहील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सवात रिक्षाचालकांचा गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी
चिपळूण तालुका प्रवासी रिक्षा चालक-मालक संघाच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत रिक्षाचालकांना सुरळीत व मुबलक गॅस पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत महानगर गॅस कंपनीकडे निवेदन देण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची तसेच रिक्षा सेवेची मोठी गरज असते. या कालावधीत गॅस पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास रिक्षा व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने रिक्षाचालक-मालकांनी गॅस पुरवठा नियमित ठेवण्याची मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप खेतले, उपाध्यक्ष संजय जोशी, सचिव प्रशांत गोरिवले, तसेच रवींद्र घाडगे, सुनात सावर्डेकर, राजू गुडेकर, निलेश गोरिवले, अनंत मोरे, रामदास भोजने, भाऊ मोरे, प्रशांत कदम, सचिन गोरिवले, सचिन शिंदे, गणेश खेडेकर, आबा डोंगरे, अखिल जुवेकर, विनोद डोंगरे, संजय सोलकर, प्रभाकर बागवे, संतोष घाणेकर यांच्यासह अनेक रिक्षाचालक उपस्थित होते.