घाटातील सुरळीत वाहतुकीसाठी आमदार किरण सामंत यांचा ‘क्रेन’चा दिलासा!
राजापूर : प्रतिनिधी अनुस्कुरा घाट परिसरात अवजड वाहतुकीमुळे वारंवार निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि बंद पडणाऱ्या वाहनांमुळे होणारा त्रास लक्षात घेऊन राजापूर–लांजा–साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी महत्त्वपूर्ण उपाययोजना केली आहे. अनुस्कुरा घाटातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी, यासाठी पांगरी येथे अत्याधुनिक क्रेन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सध्या आंबा घाटातून एकेरी वाहतूक सुरू असल्याने राजापूर तालुक्यातील अनुस्कुरा घाटावर वाहतुकीचा ताण आला आहे. अनुस्कुरा घाट हा या मार्गावरील महत्त्वाचा आणि अवघड टप्पा असून, येथे अवजड वाहने बंद पडल्यास अथवा रस्त्यावर अडथळा निर्माण झाल्यास वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असते. अशा वेळी वाहन हटविण्यास विलंब झाल्यास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
ही बाब लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांनी तातडीने दखल घेत पांगरी येथे क्रेनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अनुस्करा घाटात अवजड वाहन बंद पडल्यास ते तातडीने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यास मदत होणार आहे.
‘बंद पडलेल्या अवजड वाहनांना मदत, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तत्परता आणि प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य’ या उद्देशाने करण्यात आलेल्या या उपाययोजनेचे वाहनचालक व नागरिकांकडून स्वागत होत आहे.
अनुस्कुरा घाटातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून, आमदार किरण सामंत यांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.












