राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी; सामाजिक कार्यकर्ते बिलाल म्हाळुंकर यांची लागवडीची मागणी

मंडणगड प्रतिनिधी:
बाणकोट -पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याने पर्यावरणाची हानी झाली असून, या महामार्गाच्या दुतर्फा तातडीने वृक्षारोपण करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बिलाल म्हाळुंकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधीत यंत्रणांकडे केला आहे.
राश्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण आणि विकासकामे दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. मात्र, या कामासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनेक वर्षे जुनी मोठी झाडे तोडण्यात आल्याने परिसरातील नैसर्गिक पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम झाला असल्याचे म्हाळुंकर यांचे म्हणणे आहे.
वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय समस्यांमध्ये वाढ झाली आहे. रुंदीकरणादरम्यान झालेल्या वृक्षतोडीमुळे परिसरातील तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना सावलीचा अभाव जाणवत आहे. याशिवाय पक्ष्यांची नैसर्गिक आश्रयस्थाने नष्ट होणे, जैवविविधतेवर परिणाम होणे तसेच रस्त्यावरील धूळ आणि प्रदूषणाच्या समस्येत वाढ होण्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
रस्ते विकासाबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. विकासकामांमुळे होणारी पर्यावरणीय हानी भरून काढण्यासाठी नियोजनबद्ध वृक्षारोपण आणि लावलेल्या झाडांचे योग्य संगोपन होणे गरजेचे आहे यासाठी
कडुनिंब, वड, पिंपळ, चिंच आणि करंजाची लागवड करण्याची मागणी केली आहे.
राश्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा स्थानिक हवामानाला अनुकूल असलेली आणि सावली देणारी झाडे तातडीने लावण्यात यावीत
तसेच, वृक्षारोपणानंतर झाडांच्या संगोपनाची आणि त्यांच्या जगण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार किंवा वन विभागावर निश्चित करावी. महामार्गाच्या कामांतर्गत आतापर्यंत किती झाडे तोडण्यात आली आणि त्याबदल्यात किती झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, याची माहिती प्रशासनाने सार्वजनिक करावी, अशी मागणीही म्हाळुंकर यांनी केली आहे.
विकासासोबत पर्यावरणाचे संरक्षणही आवश्यक
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमांनुसार तसेच केंद्र सरकारच्या हरित महामार्ग धोरणाच्या अनुषंगाने वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपाययोजनांना महत्त्व देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.
महामार्गाचा विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणे ही प्रशासनाची आणि संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महामार्गाच्या दुतर्फा तातडीने वृक्षारोपण मोहीम राबवावी आणि लावलेल्या झाडांचे नियमित संगोपन होईल, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बिलाल म्हाळुंकर यांनी केली आहे