सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी घेतले श्री देव कुणकेश्वराचे दर्शन 

देवगड:सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सांभाळण्यापूर्वी सन २०२२ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे उपस्थित राहून स्वयंभू श्री देव कुणकेश्वराची विधिवत पूजा केली आणि दर्शन घेतले. प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

 

श्री क्षेत्र कुणकेश्वर भेटीदरम्यान श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या वतीने डॉ. अपूर्वा बासुर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, ग्रामपंचायत कुणकेश्वरचे प्रशासक महेश ताम्हणकर, ग्रामसेवक गुणवंत पाटील, देवगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चव्हाण तसेच देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी डॉ. बासुर यांना त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस व उज्ज्वल कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. अपूर्वा बासुर यांच्यासमोर जिल्ह्यातील ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण तसेच जिल्हा परिषदेच्या विविध कल्याणकारी योजनांची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. त्यांच्या या नव्या कार्यकाळात जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे