उद्योजक डॉ. श्रीकृष्ण (दीपक) परब यांचा वायंगणी स्वामी समर्थ मठात विशेष सत्कार

मसुरे | झुंजार पेडणेकर :श्री स्वामी समर्थ मठ, वायंगणी यांस नेहमीच मोलाचे सहकार्य करणारे मसुरे गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांनी नुकतेच स्वामी समर्थ मठाला संगणक संच आणि प्रिंटर भेट दिला. त्यांच्या या भरीव योगदानाबद्दल मठ व्यवस्थापनाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपक सुर्वे उपस्थित होते. याप्रसंगी कार्याध्यक्ष बाबू हडकर, पंडित खोत, कल्याण साळकर, दिनेश साळकर, प्रफुल्ल माळकर, रूपेश राणे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत (बाबू) हडकर यांनी डॉ. परब यांच्या सामाजिक आणि धार्मिक योगदानाचा गौरव केला. आपल्या मनोगतात ते म्हणाले,

डॉ. दीपक परब हे केवळ सामाजिक बांधिलकी जपणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. स्वामी समर्थ मठावर त्यांची नेहमीच श्रद्धा राहिली असून, मठाच्या प्रत्येक कार्यात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. आजच्या डिजिटल युगात मठाच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक कामासाठी त्यांनी दिलेला संगणक आणि प्रिंटर अत्यंत उपयुक्त ठरेल. मठाच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि स्वामी समर्थ त्यांच्या पाठीशी नेहमी असेच यश आणि उत्तम आरोग्य देवो, हीच प्रार्थना करतो असे मनोगत व्यक्त केले.

डॉ. श्रीकृष्ण परब यांनीही सत्काराला उत्तर देताना स्वामी समर्थ मठाच्या सेवाकार्यात यापुढेही असाच खारीचा वाटा उचलत राहीन, अशी ग्वाही दिली. उपस्थितांनी डॉ. परब यांच्या दातृत्वाचे आणि स्वामी निष्ठेचे कौतुक केले.