▪️उपविभागीय कृषी अधिकारी, कणकवली यांचे आवाहन
मसुरे | झुंजार पेडणेकर
गणेशोत्सवानिमित्त मुंबई व इतर शहरांतून गावी येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी विभागाने आवाहन केले आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी *ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी* (AgriStack Farmer ID) बंधनकारक करण्यात आला आहे. तरी ज्या शेतकरी बांधकांनी अद्यापपर्यंत ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी काढलेला नाही, अशा शेतकरी बांधकांनी आपल्या जवळच्या सी.एस.सी. सेंटर (CSC) वरून किंवा स्वतःच्या मोबाईलवरून ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काढून घ्यावा.
*पी एम किसान सन्मान निधी योजना:*
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या ज्या शेतकरी बांधकांनी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काढलेला नाही, तसेच ई-केवायसी (e-KYC) व आधार सीडिंग केलेले नाही, अशा लाभार्थी शेतकरी बांधकांनी कृषी विभागाशी संपर्क साधून ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काढून घ्यावा व ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
*महाविस्तार एआय (MahaVistar-AI) ॲप:*
सर्व शेतकरी बांधकांनी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून महाविस्तार एआय (MahaVistar-AI) हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून त्याचा शेतीविषयक अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी वापर करावा.
*मागेल त्याला काजू कलमे प्रकल्प:*
‘मागेल त्याला काजू कलमे प्रकल्प’ या योजनेतून शेतकऱ्यांना १० ते ५० काजू कलमे मोफत देण्यात येत आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत.
*महाडीबीटी पोर्टलवरील इतर योजना:*
शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागामार्फत विविध शेतीविषयक योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये यंत्रिकीकरण (यंत्र/औजारे, औजारे बँक), ठिबक सिंचन, शेततळे, पॅक हाऊस, फळबाग पुनरुज्जीवन, काळी मिरी लागवड, प्लास्टिक मल्चिंग, विड मॅट आणि स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड इत्यादी बाबींचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत.
*प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना:*
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी इच्छुक असलेले शेतकरी, अन्न प्रक्रिया उद्योजक, महिला व युवा उद्योजक यांनी कृषी विभागाकडे संपर्क साधून अर्ज करावेत.
*महिला शेतकरी सक्षमीकरण:*
शेती व शेतीपूरक काम करणाऱ्या महिलांनी ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६’ अंतर्गत *’महिला शेतकरी प्रमाणपत्र’* प्राप्त करून घेण्यासाठी साहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
*ई-पीक पाहणी:*
सर्व शेतकरी बांधकांनी आपल्या गावासाठी नियुक्त केलेल्या ई-पीक पाहणी साहाय्यकांशी संपर्क साधून आपल्या शेतातील खरीप पिके, भाजीपाला व फळपिकांची ई-पीक पाहणी वेळेत पूर्ण करून घ्यावी.
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या साहाय्यक कृषी अधिकारी / उप कृषी अधिकारी / मंडळ कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
* तालुका कृषी अधिकारी, कणकवली
* तालुका कृषी अधिकारी, देवगड
* तालुका कृषी अधिकारी, वैभववाडी
* उपविभागीय कृषी अधिकारी, कणकवली
* जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग













