खांबाळेत बिबट्याचा मुक्त संचार ; ग्रामस्थांमध्ये भीती

वैभववाडी प्रतिनिधी :
खांबाळे-चव्हाटेवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, शुक्रवारी सायंकाळी एका महिलेला मादी बिबट्या व तिचे दोन बछडे दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली. बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या दर्शनामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत शनिवारी सायंकाळी वन विभागाचे पथक खांबाळे गावात दाखल झाले.

गुरुवारी रात्रीही खांबाळे-कोकिसरे मार्गावर बिबट्याचे दर्शन झाले होते. खांबाळेचे माजी उपसरपंच गणेश पवार, त्यांचे सहकारी विक्रांत पवार व जयेश पवार हे कारमधून प्रवास करीत असताना त्यांना रस्त्यावर बिबट्या दिसला. त्यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याचे छायाचित्र व व्हिडीओ मोबाईलमध्ये टिपला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे परिसरात बिबट्याच्या वावराची चर्चा अधिकच रंगली आहे.

शुक्रवारी चव्हाटेवाडी परिसरात स्थानिक ग्रामस्थांना मादी बिबट्या व तिचे दोन बछडे दिसून आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या वावराची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी वन विभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.

त्यानंतर वनपाल सुरेश पटकारे व वनरक्षक रामदास घुगे शनिवारी सायंकाळी खांबाळे गावात दाखल झाले. वन विभागाच्या पथकाने बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची पाहणी करून ग्रामस्थांकडून माहिती घेतली. तसेच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सायंकाळी जलद कृती दलालाही पाचारण करण्यात आले.

बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस परिसरात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच रविवारी बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती वनपाल सुरेश पटकारे यांनी दिली.

दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.