कौले काढून आत शिरला चोरटा
सावंतवाडी :
तालुक्यातील ओवळीये-वरचीवाडी येथे बंद घराच्या छपरावर चढून कौले काढून अज्ञात चोरट्याने कपाटातील सुमारे दोन लाख पाच हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. हा घरफोडीचा प्रकार मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे ओवळीये गावात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. याबाबत घरमालक कौस्तुभ विष्णू सावंत (वय ३३) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कौस्तुभ सावंत हे सावंतवाडी येथील मोती तलावाच्या काठावर सकाळी चहा-नाश्त्याचा टेम्पो लावून व्यवसाय करतात. दररोजच्या नियमाप्रमाणे कौस्तुभ सावंत, त्यांची पत्नी आणि आई हे तिघेजण सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घर बंद करून वाहनाने सावंतवाडी येथे हॉटेल व्यवसायासाठी आले होते. सकाळी साडेनऊ वाजता कौस्तुभ यांची आई एसटी बसने ओवळीये येथील घरी परतली. घरी पोहोचल्यानंतर तिने मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला असता, मधल्या खोलीतील लोखंडी कपाटाचे दरवाजे उघडलेले आणि आतील सर्व सामान अस्ताव्यस्त पसरलेले दिसले.
संशय आल्याने वर पाहिले असता घराच्या छपराची कौले काढलेली निदर्शनास आली. तिने तात्काळ मुलगा कौस्तुभ याला फोनवरून या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कौस्तुभ सावंत आणि त्यांच्या पत्नीने व्यवसाय बंद करून ओवळीये गाठले. घराची पाहणी करून कपाटातील मौल्यवान वस्तूंची तपासणी केली असता, कपाटात ठेवलेले ४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि ३ ग्रॅम वजनाची बाली असा एकूण सुमारे २ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. या चोरीप्रकरणी कौस्तुभ सावंत यांनी सावंतवाडी पोलिसांत दिलेल्या माहितीवरून पोलीस अधिक तपास करत आहेत.










