सावंतवाडी नगरपालिकेत पाणीपुरवठा विभागाचे रजिस्टर गहाळ

कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, संशयित अधिकाऱ्याच्याच तक्रारीमुळे खळबळ

सावंतवाडी :सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील वस्तू नोंद व वापर रजिस्टर परस्पर ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी एका कर्मचाऱ्याविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १९ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान घडली असून १२ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्यावर स्वतः ऑडिटसाठी पुरवठादाराकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे, त्यांनीच ही तक्रार दिल्याने या प्रकरणाभोवती संशयाचे जाळे निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी नगरपालिकेतील कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी रजेवर असताना या संधीचा फायदा घेऊन नगरपालिकेत जोडारी (प्लंबर) म्हणून कार्यरत असलेल्या भारत बाबू लाखे (वय ५६, रा. लाखे वस्ती, सावंतवाडी) यांनी पाणीपुरवठा विभागाची नोंद व वापर रजिस्टर्स हाताळली. त्यातील नोंदी नष्ट करण्याच्या अथवा लपवण्याच्या उद्देशाने हे रजिस्टर्स एका पिशवीत ठेवून त्यांची विल्हेवाट लावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी पाणी पुरवठा विभागातील अधिकारी संजय गोविंद पोईपकर (वय ५१, रा. वझरवाडी, सावंतवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावंतवाडी पोलिसांनी भारत लाखे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सपोनि हर्षद हिंगे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपीला अटक करण्याची तजवीज पोलीस करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणाला राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात वेगळेच वळण मिळाले आहे. तक्रारदार अधिकारी पोईपकर यांच्यावर यापूर्वीच ऑडिटसाठी पुरवठादाराकडून मोठी रक्कम घेतल्याचा गंभीर आरोप आहे.

सभेमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि पाणी पुरवठा समितीसमोर त्यांनी याबाबतची कबुलीही दिली होती; तसेच पुरवठादारानेही स्थायी समितीत पैसे दिल्याचे मान्य केले होते. असे असतानाही तेच अधिकारी आता कर्मचाऱ्याविरोधात तक्रार देत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

तसेच प्रभारी मुख्याधिकाऱ्यांवरही बिल मंजूर करण्यासाठी घाई करत असल्याचा आरोप पाणी पुरवठा समितीच्या सदस्याने मासिक सभेत केला होता. या संपूर्ण प्रकरणाची नैतिकता स्वीकारून पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिला असून माजी नगराध्यक्ष संजू परब यांनीही सभागृहात त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

नगरपालिकेतील या कथित भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे आधीच करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी आपल्याला पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांचा वारसा लाभला असल्याचे सांगत, वेळप्रसंगी कठोर निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. नगरपालिका परिसर पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली असताना रजिस्टर कसे गहाळ झाले, असा प्रश्न उपस्थित होत असून प्रवेशद्वारापासून स्टॉक रूमपर्यंतचे फुटेज तपासून मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.