मध्य प्रदेशातील भिक्षूक असल्याचे तपासात उघड
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात साधूच्या वेशात गृपने फिरून भीक्षा मागणाऱ्या काही व्यक्तींना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. आज दुपारच्या सुमारास सावंतवाडी बाजारपेठेत ही घटना घडली. शहरात घडणाऱ्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या मंडळींची ओळखपत्रे तपासून त्यांना पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी साधूच्या वेशातील काही लोकांचा समूह सावंतवाडीच्या मुख्य बाजारपेठेत भीक्षा मागत फिरत होता. या लोकांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तातडीने त्यांना थांबवून त्यांची विचारपूस केली. प्राथमिक चौकशीत हे सर्व जण मध्य प्रदेश येथील रहिवासी असल्याचे समोर आले. आपण सर्व जण भीमाशंकरच्या दर्शनासाठी जात होतो, मात्र सावंतवाडीत आपली गाडी अचानक बंद पडल्यामुळे प्रवासाच्या खर्चासाठी बाजारात भीक्षा मागत होतो, असा दावा या लोकांनी पोलिसांशी बोलताना केला.
यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्या सर्वांची ओळखपत्रे तपासून पाहिली आणि अधिक पडताळणीसाठी त्यांना पोलीस ठाण्यात नेले.
या घटनेबाबत माहिती देताना नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी सांगितले की, सध्या शहरात घडणाऱ्या विविध गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना आणि फसवणुकीचे प्रकार लक्षात घेता, अशा प्रकारे अज्ञात किंवा संशयास्पद रीतीने फिरणाऱ्या व्यक्तींची पोलिसांनी तातडीने चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांची योग्य ओळख तपासल्यामुळे नागरिकांची होणारी फसवणूक आणि संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यास मोठी मदत होईल. या संपूर्ण घडामोडीच्या वेळी बाजारपेठेतील स्थानिक व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












