कोकण अन्याय निवारण समितीचा आक्षेप
चिपळूण (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेमध्ये ऑफिस बॉय, हेल्पर व खलाशी या पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या कोकणातील तीन जिल्ह्यांतील स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी कोकण अन्याय निवारण समितीने केली आहे. या भरती प्रक्रियेत कोकणाबाहेरील उमेदवार मुलाखतीसाठी येत असल्याचे निदर्शनास आल्याने समितीने रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.
कोकण रेल्वेमध्ये सध्या ऑफिस बॉय, हेल्पर आणि खलाशी या पदांच्या सुमारे ३० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठी तब्बल ६०० ते ७०० अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. या पदांसाठी रत्नागिरी येथील कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयात उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. संबंधित पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेत कोकणातील मोठ्या संख्येने बेरोजगार युवक उपलब्ध असताना कोकणाबाहेरील उमेदवारांना मुलाखतीची संधी देण्याची आवश्यकता काय, असा सवाल कोकण अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन भरती प्रक्रियेत कोकणातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.
रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी, अशी समितीची भूमिका आहे. स्थानिक तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार असताना त्यांच्या हक्काच्या रोजगाराच्या संधी बाहेरील उमेदवारांना मिळू नयेत, अशी मागणी मुकादम यांनी केली. “कोकणातच पात्र कामगार उपलब्ध असताना बाहेरील उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची आवश्यकता काय? या भरती प्रक्रियेवर आमचे लक्ष असून कोकणातील बेरोजगारांवर अन्याय होऊ देणार नाही,” असा इशारा शौकत मुकादम यांनी दिला. इतर राज्यांमध्ये किंवा प्रांतांमध्ये रेल्वेच्या भरती प्रक्रियेत कोकणातील बेरोजगारांना कितपत संधी मिळते, याचाही विचार रेल्वे प्रशासनाने करावा, असे त्यांनी नमूद केले. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समिती यापुढेही भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवणार असल्याचे मुकादम यांनी स्पष्ट केले.












