कणकवली तालुक्यात सकाळीच धुक्याची दाट चादर!

वाहनचालकांकडून सावधगिरीने प्रवास

कणकवली : तालुक्यात बुधवारी सकाळपासून दाट धुके पसरले असून, संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत हरवून गेला आहे. दाट धुक्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना पुढील काही अंतरावरील रस्ताही स्पष्टपणे दिसेनासा झाला. त्यामुळे वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालवावे लागत आहे. सकाळच्या सुमारास तालुक्यातील विविध भागांमध्ये दाट धुक्याचे वातावरण पाहायला मिळाले. रस्ते, झाडे आणि आजूबाजूचा परिसर धुक्यात झाकला गेला होता. त्यामुळे वाहनचालकांना पुढील रस्त्याचा अंदाज घेत प्रवास करावा लागत होता. दाट धुक्याचा परिणाम महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरही जाणवत होता. कमी दृश्यमानतेमुळे वाहनचालकांना वाहनांचा वेग कमी ठेवून सुरक्षित अंतर राखत प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, सकाळच्या धुक्यामुळे कणकवली तालुक्यातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून, धुक्याने न्हाऊन निघालेला परिसर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.