मारहाणीत उजव्या गुडघ्याखालील हाड मोडले
कळसुली-गांगोसखलवाडी येथील घटना
कणकवली : कळसुली – गांगोसखलवाडी येथे मोटारसायकल न दिल्याच्या रागातून शेजाऱ्याने हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी जमिनीवर पडलेला दगड उचलून उजव्या गुडघ्याखाली मारल्याने हॉटेल व्यावसायिकाच्या पायाचे हाड मोडून गंभीर दुखापत झाली.
याबाबत चंद्रकिरण बाळकृष्ण गावकर (वय ५०, शिक्षण १० वी, व्यवसाय हॉटेल, रा. मु.पो. कळसुली – गांगोसखलवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चंद्रकिरण गावकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे राहते घर कळसुली – गांगोसखलवाडी येथे असून तेथे ते व त्यांचे भाऊ कीर्तीकुमार बाळकृष्ण गावकर असे दोघे राहतात. त्यांची पत्नी चैताली व मुलगा तुषार हे कामानिमित्त मुंबई येथे राहतात. गणपती सणानिमित्त १३ सप्टेंबर रोजी पत्नी व मुलगा गावी आले होते. कळसुली पोस्टाजवळ गावकर यांचे हॉटेल असून ते सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेल उघडतात आणि रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बंद करतात. त्यांच्या घराशेजारी वैभव चंद्रकांत घाडीगावकर हा आपल्या कुटुंबासह राहतो. तो गावकर यांच्या घरी ये – जा करत असतो. गावकर यांच्याकडे डिस्कव्हर मोटारसायकल (एमएच ०२ सीएस २४८६) असून वैभव घाडीगावकर हा अधूनमधून कामासाठी ती घेऊन जात असे. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वा. च्या सुमारास गावकर हे कळसुली पोस्टाजवळील आपल्या हॉटेलमध्ये असताना वैभव घाडीगावकर तेथे आला. त्याने गावकर यांच्याकडे मोटारसायकल मागितली. मात्र, गावकर यांनी मोटारसायकल देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने वैभव याने गावकर यांना शिवीगाळ केली आणि तो परबवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने निघून जाऊ लागला. यावेळी गावकर यांनी त्याला जोरात हाक मारून, तू मला शिवीगाळ का करतोस? असे विचारले. त्यानंतर वैभव याने पुन्हा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. गावकर हे त्याला समजावून सांगण्यासाठी त्याच्या जवळ गेले असता वैभव याने शिवीगाळ करत हाताने मारहाण करून त्यांना जमिनीवर पाडले. त्यानंतर जमिनीवर पडलेला दगड उचलून तो गावकर यांच्या उजव्या गुडघ्याच्या खाली मारला. दगडाचा मार लागल्याने गावकर यांच्या पायातून रक्तस्राव होऊ लागला. त्यानंतर वैभव याने हातातील दगड तेथेच टाकून घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर गावकर यांची पत्नी चैताली तसेच गावातील काही नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी गावकर यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर गावकर यांच्या उजव्या गुडघ्याच्या खालचे हाड मोडल्याचे सांगितले.
घटनेच्या दिवशी उपचार सुरू असल्याने गावकर यांना पोलिस ठाण्यात तक्रार देता आली नव्हती. प्रकृती सुधारणा झाल्यानंतर गावकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मोटारसायकल न दिल्याचा राग मनात धरून वैभव चंद्रकांत घाडीगावकर (वय ३५, रा. कळसुली – गांगोसखलवाडी, ता. कणकवली ) याने शिवीगाळ करून हाताने मारहाण केली आणि दगडाने उजव्या गुडघ्याखाली मारल्याने गंभीर दुखापत झाल्याची तक्रार चंद्रकिरण गावकर यांनी केली आहे. या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५(२), ११८(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुनील वेंगुर्लेकर करत आहेत.












