बांदा पोलिसांच्या कारवाईतील ३ लाख २२ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
कणकवली : प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी राजन शांताराम पारकर (वय ६१, रा. जळकेवाडी, कणकवली) व रवींद्र मुकुंद माणगावकर (वय ३४, रा. बाजारपेठ, कणकवली) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे अटक टाळण्यासाठी आता दोन्ही आरोपींना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.
३० जुलै २०२६ रोजी बांदा पोलीस चेकपोस्ट येथे सुमारे ५ लाख रुपये किमतीच्या मारुती इको कारमधून ३ लाख २२ हजार ३०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच मोबाईल असा मुद्देमाल बांदा पोलिसांनी जप्त केला होता. याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये दाखल या गुन्ह्यात मुख्य आरोपी आसिफ मेमन (रा. कोलगाव, सावंतवाडी) याच्यासह कृष्णा केळजी (रा. वेंगुर्ले), गणेश शिवगण (रा. जामसंडे, देवगड), शिवाजी चव्हाण (रा. फणसोप, रत्नागिरी), राजन पारकर (रा. जळकेवाडी, कणकवली), रवींद्र माणगावकर (रा. बाजारपेठ, कणकवली) व तपर्शी आमोणकर (रा. म्हापसा, गोवा) यांच्याविरोधात ३० जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी राजन पारकर व रवींद्र माणगावकर यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जाला सरकारी पक्षाने हरकत घेतली. सरकारी वकील संदीप राणे व रुपेश देसाई यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना दोन्ही आरोपींचा या गुन्ह्यात प्रथमदर्शनी सक्रिय सहभाग असल्याचे नमूद केले.
मुख्य आरोपी आसिफ मेमन याच्याकडून राजन पारकर व रवींद्र माणगावकर यांनी यापूर्वी प्रतिबंधित गुटखा माल खरेदी करून त्याची विक्री केली असून त्यातून आर्थिक लाभ मिळवल्याचा दावा सरकारी पक्षाने केला. तसेच प्रतिबंधित गुटखा मालाचा पुरवठादार, मालक, वित्तपुरवठा करणारे अन्य सहआरोपी तसेच संपूर्ण वितरण साखळीचा तपास अद्याप सुरू असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
प्रतिबंधित गुटख्याच्या खरेदी-विक्रीबाबत मुख्य आरोपी मेमन याच्याशी राजन पारकर व रवींद्र माणगावकर यांचे संभाषण झाल्याचे तपासात समोर आले आहे. आर्थिक व्यवहार व अन्य पुरावे मिळविण्यासाठी दोन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.
आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास ते तपासासाठी मोबाईल हजर करतीलच असे नाही तसेच तपासात सहकार्य न करण्याची शक्यता असल्याचेही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. मुख्य आरोपीकडून प्रतिबंधित गुटखा खरेदी करणाऱ्या या दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास करणे बाकी असल्याचेही सरकारी पक्षाने स्पष्ट केले.
प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने हा गुन्हा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर स्वरूपाचा आहे. अशा प्रकरणात सहज जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, असा युक्तिवादही सरकारी वकिलांनी केला. त्यामुळे आरोपी राजन पारकर व रवींद्र माणगावकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली.
दरम्यान, आरोपींच्या वकिलांनी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायालयाने राजन पारकर व रवींद्र माणगावकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता अटक टाळण्यासाठी दोन्ही संशयित आरोपी उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.











