प्रवीण नाडणकर कुटुंबीयांची संकल्पना
जुन्या ग्रामीण जीवनशैलीचे दर्शन
राजेंद्र साटम, शिरगाव
देवगड तालुक्यातील साळशी येथे प्रवीण नाडणकर व कुटुंबीयांनी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त जुन्या ग्रामीण जीवनशैलीवर आधारित सजावट साकारली आहे. मातीच्या भिंती, शेणाने सारवलेले अंगण, पारंपरिक चूल, मडकी, सूप, टोपली अशा जुन्या काळातील वस्तूंच्या मांडणीतून गावाकडच्या जीवनाचे चित्र उभे करण्यात आले आहे. मातीच्या भिंतींवर रेखाटलेली वारली चित्रकला या देखाव्याला विशेष उठाव देत आहे.
जामसंडे येथील मूर्तिकार बाबा घाडी यांनी शाडू मातीपासून गणपतीची साधी, पारंपरिक मूर्ती साकारली आहे. नैसर्गिक साहित्याचा वापर करून उभारलेल्या या सजावटीतून जुन्या काळातील घराची रचना आणि दैनंदिन जीवनातील वस्तूंची ओळख करून देण्यात आली आहे.
आधुनिक जीवनशैलीकडे वाटचाल करताना आपल्या मुळांचा विसर पडू नये, तसेच ग्रामीण संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, हा या संकल्पनेमागील उद्देश आहे. सजावटीसाठी नाडणकर कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे मेहनत घेतली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि उत्साहात हा सोहळा साजरा करतात. त्यामुळे गणेशोत्सवाला आनंदोत्सवाचे स्वरूप प्राप्त होते. अकरा दिवसांच्या उत्सवात दररोज आरती व भजनाचे आयोजन केले जाते. तसेच सत्यनारायण महापूजेचेही आयोजन करण्यात येते.
जुन्या ग्रामीण जीवनाची आठवण जागवणाऱ्या या सजावटीसोबतच कुटुंबीयांचा एकोपा आणि पारंपरिक संस्कृतीशी असलेली नाळही या उपक्रमातून अधोरेखित होत आहे.










