सिंधुदुर्गातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आयोजकांचे आवाहन
बांदा: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या निर्माण झालेला रक्ताचा भयंकर तुटवडा काही प्रमाणात भरून काढण्याच्या उद्देशाने, येत्या रविवारी म्हणजेच दिनांक १४ जून २०२६ रोजी जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून बांदा येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कट्टा कॉर्नर बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय या ठिकाणी हे शिबिर पार पडणार आहे. जिल्ह्यातील रक्ताची वाढती गरज लक्षात घेता, जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या महापुण्यदानात सहभागी होऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हे भव्य रक्तदान शिबीर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आणि सहकार्यातून साकारत आहे. यामध्ये श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा, सार्वजनिक नवरात्रौत्सव व कला क्रीडा मंडळ (कट्टा कॉर्नर बांदा), ज्येष्ठ नागरिक विकास मंच (बांदा) आणि रक्तदान चळवळीत सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारी ‘ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग’ यांचा मुख्य सहभाग आहे. तसेच या शिबिराला लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शाखा बांदा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. रविवारी दि. १४ जून २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १.०० या वेळेत हे शिबिर सर्वांसाठी खुले राहील.
जिल्ह्यातील रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आणि रक्ताची निकड भागवण्यासाठी हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या शिबिरात रक्तदान करण्यास इच्छुक असलेल्या दात्यांनी अधिक माहितीसाठी तसेच नाव नोंदणीसाठी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष श्री दयानंद गवस (९८२१४४४१७०), स्वराज्य प्रतिष्ठानचे निलेश मोरजकर (९७६३७१७७९०) व अक्षय मयेकर (९५०३८७१९२४), सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे नाना शिरोडकर (९७६७५७७७७४), ज्येष्ठ नागरिक विकास मंचचे सचिव गुरुनाथ नार्वेकर (९४२२३७९३४६) आणि समीर परब (९८२३८३०११९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकीच्या या पवित्र कार्यात बांदा परिसरातील नागरिकांनी व तरुणांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.












