काही ठिकाणी भात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती
लांजा (प्रतिनिधी) : सप्टेंबर महिना संपत आला तरी पावसाचे चिन्ह नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. तर तालुक्याच्या काही विभागात पावसामुळे भात पिके करपू लागली असून शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी आहे. जुलै महिन्यात पावसाने चांगली बॅटिंग केली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्येही पाऊस चांगल्यापैकी पडला होता. मात्र सप्टेंबर महिन्यात मात्र पावसाने मारलेल्या दडीमुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. सध्या भात शेती ला पावसाची गरज आहे. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील शेती धोक्यात आले आहे. तालुक्याच्या काही गावांमध्ये भात शेती सुकू लागल्याचे चित्र आहे. सरीवर देखील पाऊस पडत नसल्याने भात पिकाला आवश्यक त्या प्रमाणात पाणी मिळत नसल्याने भात शेती धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
पावसाने अशीच दडी मारली तर तालुक्यातील शेती पूर्णपणे करपली जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला असून पावसाकडे डोळे लावून बसला आहे. मात्र दिवसभरात एकदाही पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काबाडकष्ट करून केलेली शेती पावसा अभावी वाया जाणार नाही ना? अशी चिंता शेतकऱ्याला सताऊ लागली आहे. तर उन्हामुळे भात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग हैरान झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.











