आई-वडिलांचे महत्त्व सांगणाऱ्या संस्कारक्षम उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
वेंगुर्ले : दाजी नाईक
तालुक्यातील आरवली येथील श्रीदेव वेतोबा मंदिराच्या अन्नशांती सभागृहात ‘मातृ-पितृ देवो भव’ या संकल्पनेवर आधारित ‘मातृ-वंदना’ विशेष संस्कारी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘आईसारखे दैवत नाही, माता ही सर्वश्रेष्ठ’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून आई-वडिलांचे महत्त्व आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात मुलांनी आपल्या आईची पाद्यपूजा करून मातृवंदना केली. आईची पाद्यपूजा हा मुलांसाठी प्रेरणादायी संस्कार ठरावा, या उद्देशाने सुंदर प्रक्षेपणाच्या माध्यमातून मातृ-वंदना कार्यक्रम सादर करण्यात आला.
यावेळी ‘आई’ या विषयावर ५०० शब्दांची निबंध स्पर्धा घेण्यात आली. रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी तब्बल ८० निबंध प्रवेशिका प्राप्त झाल्या. शालेय तसेच खुला गट अशा दोन विभागांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेतून १६ स्पर्धकांची निवड करून त्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
मातृ-वंदना कार्यक्रमा सोबतच स्तोत्रपठण, गणपती स्तोत्र तसेच अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. यामध्ये पंचक्रोशीतील २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
*रामदासजी तेंडुलकर यांच्या प्रवचनाने उपस्थित मंत्रमुग्ध*
आईचा महिमा कथन करणारे सुश्राव्य व सुंदर प्रवचन पावशी कुडाळ येथील रामदास तेंडुलकर यांच्या रसाळ वाणीतून झाले. त्यांच्या प्रभावी प्रवचनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. मातृ-वंदना कार्यक्रमातील त्यांचे प्रवचन विशेष दखलनीय ठरले.
मातृ-वंदनेची संकल्पना रामदास तेंडुलकर यांनी सरंबळ येथे माजी सरपंच अजय कदम यांच्या घरी संत बाळूमामा सत्संगी मातृवंदनेच्या माध्यमातून साकार केली होती. या संकल्पनेने प्रभावित होऊन प्रकाश मिशाळ व उदय पार्सेकर यांनी वेतोबा देवस्थानचे जयवंत राय यांना प्रेरित केले आणि आरवली येथे मातृ-वंदना कार्यक्रम प्रत्यक्षात साकार झाला.
या कार्यक्रमासाठी रामदास तेंडुलकर यांच्या सोबत संदीप तावडे, अजय कदम, प्रियंका मोरजकर व प्राजक्ता परब हे विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होते.
दरम्यान आरवली येथील या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीदेव वेतोबा देवस्थान, आरवली ; श्रीमत् भगवद्गीता भक्तपरिवार, शिरोडा; जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघ, मळेवाड आणि आरंभ प्रतिष्ठान यांचे बहुमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या सादरीकरणा साठी वेतोबा देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमोद नाईक, आरंभ प्रतिष्ठानचे उत्तम चव्हाण आणि भगवद्गीता परिवाराचे गणेश पाटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वयंसेवक व सदस्यांनीही सेवाभावाने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रोत्यांनी मातृ-वंदनेच्या या उपक्रमाची शोभा वाढविली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत राय व प्रमोद नाईक यांनी केले, तर उदय शिरोडकर यांनी आभार मानले.












