कणकवलीच्या मानाच्या संतांच्या गणपतीचे अबिद नाईक यांनी घेतले दर्शन

कमी पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती दूर होण्यासाठी गणरायाकडे प्रार्थना

 

कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व प्रसिद्ध वकील उमेश सावंत यांनी कणकवली शहरातील टेंबवाडी येथील मानाच्या संतांच्या गणपतीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती दूर होऊन राज्यात भरपूर पाऊस पडावा, अशी प्रार्थना यावेळी गणरायाच्या चरणी करण्यात आली.

 

कणकवली शहरातील टेंबवाडी येथे प्राचीन काळापासून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ११ दिवस संतांच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. नवसाला पावणारा कणकवली गावाचा गणपती म्हणून संतांच्या गणपतीची ख्याती आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत हजारो भाविक या गणपतीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा-अर्चा करतात.

 

दरवर्षीप्रमाणे कणकवली शहरातील गणपतींचे दर्शन घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी प्रसिद्ध वकील उमेश सावंत यांच्या समवेत संतांच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मनोभावे पूजा करून यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती दूर व्हावी आणि शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी भरपूर पाऊस पडण्याची प्रार्थना केली.

 

यावेळी संतांच्या गणपतीचे मानकरी सुनील सावंत व संजय सावंत यांनी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक तसेच प्रसिद्ध वकील उमेश सावंत यांचा सन्मान केला. यावेळी गणपती मूर्तिकार महेश कुवळे, धीरज साटम आदी उपस्थित होते.