राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; दसऱ्यानंतर होणार भव्य बक्षीस वितरण समारंभ
रत्नागिरी :
‘दैनिक प्रहार’ आणि ‘प्रहार डिजिटल रत्नागिरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘साज गौरी-गणपतीचा’ या ऑनलाइन गौरी-गणपती मखर सजावट स्पर्धेला यंदाही गणेशभक्तांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष असून, या स्पर्धेचा बहुप्रतिक्षित निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दसऱ्यानंतर एका विशेष कार्यक्रमात विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेला कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला. कोकणाची वेस ओलांडून ही स्पर्धा थेट राज्यभरात पोहोचली असून सातारा, सांगली, जळगाव, भंडारा, पुणे अशा विविध जिल्ह्यांतूनही गणेशभक्तांनी आपल्या घरगुती मखर सजावटीचे व्हिडिओ पाठवले आहेत. मात्र, या स्पर्धेचे स्वरूप जिल्हास्तरीय असल्याने केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांच्याच प्रवेशिका आणि व्हिडिओंचा अंतिम निकालासाठी विचार केला जाईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

परीक्षकांकडून सध्या सर्व व्हिडिओंची काटेकोर तपासणी सुरू आहे. स्पर्धेसाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर आणि अटी-शर्तींचा विचार करूनच विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
अपडेट्ससाठी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
स्पर्धेचा निकाल, बक्षीस वितरण समारंभाची तारीख आणि पुढील सर्व अधिकृत माहिती मिळवण्यासाठी स्पर्धकांनी ‘प्रहार डिजिटल रत्नागिरी’च्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. बातमीसोबत दिलेला क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करून अथवा सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून स्पर्धकांना ग्रुपमध्ये सहभागी होता येईल, असे आवाहन दैनिक प्रहार व प्रहार डिजिटलच्या वतीने करण्यात आले आहे.











