कुंभ्याचा दंड येथील अमोल कोळी या शेतकऱ्याचे सुमारे २ लाखाचे नुकसान
निलेश जाधव / देवरूख : माळरानावर चरत असताना तुटून पडलेल्या वीज तारेचा शॉक लागून दोन गाभण म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील मार्लेश्वर तिठा परिसरात घडली आहे. या घटनेत शेतकरी अमोल कोळी यांचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांना महावितरणकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
देवरूख कुंभ्याचा दंड येथील शेतकरी अमोल कोळी यांच्या मालकीच्या या दोन मुरा जातीच्या म्हशी होत्या. ते दरदिवशी आपली जनावरे चरण्यासाठी मार्लेश्वर तिठ्याजवळील माळरानावर चरायला घेवून जात असत. शनिवारीही ते जनावरे चरावयास घेवून गेले होते. जनावरे चरत असताना माळावर तुटून पडलेल्या वीज तारेच्या संपर्कात आल्याने दोन म्हशींना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोन म्हशी विजेच्या धक्क्याने गतप्राण झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच बाकीची जनावरे त्यांनी बाजूला नेली. त्यामुळे ती बचावली आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे अमोल कोळी यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. गाभण असलेल्या म्हशींच्या मृत्यूमुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे, महावितरणने तातडीने पंचनामा करून अमोल कोळी यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. दोन गाभण म्हशींचा अशाप्रकारे वीज तारेच्या धक्क्याने डोळ्यादेखत तडफडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने अमोल कोळी हे अक्षरशः कोलमडून गेले आहेत. त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना महावितरणने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.










