मुलींच्या संघाची उपविजेतेपदाची कामगिरी
चिपळूण (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एस. व्ही. जे. सी. टी. डेरवण येथे तालुकास्तरीय १७ वर्षे वयोगटातील कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील १७ वर्षे मुलांच्या संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर मुलींच्या संघाने उपविजेतेपद मिळवले.
१७ वर्षे मुलांच्या अंतिम सामन्यात सावर्डे विद्यालयाच्या संघाने अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण संघावर मात करत अंतिम विजय मिळवला. या विजयामुळे सावर्डे विद्यालयाच्या मुलांच्या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे. सामन्यात शौर्य खापरे याने अत्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तसेच समर्थ घाणेकर, सार्थक घडशी, सर्वेश खापरे, सार्थक घाणेकर, आयुष घाणेकर, आर्यन यादव, स्वराज्य राडे, अर्णव घडशी आणि हर्ष राडे यांनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. याच स्पर्धेत १७ वर्षे मुलींच्या कबड्डी संघानेही दमदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. मुला-मुलींच्या संघांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सावर्डे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण यशाची परंपरा कायम राहिली आहे. या खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आमदार शेखर निकम, उपाध्यक्ष प्रशांत निकम, युगंधरा राजेशिर्के, डॉ. इसाक खतीब, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक, संस्थेचे विश्वस्त व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती सदस्य तसेच मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण आणि पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांनी विजयी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी १७ वर्षे मुलांच्या संघाला शुभेच्छा देण्यात आल्या. सावर्डे विद्यालयाच्या मुला-मुलींच्या या दुहेरी यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.












