शिक्षक चंद्रशेखर कारेकर यांचे आकस्मिक निधन

गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील तळवली भेळेवाडी येथील रहिवासी चंद्रशेखर कारेकर यांचे वयाच्या 58 वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले.
कै. चंद्रशेखर कारेकर हे सध्या वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे येथे यशवंतराव चव्हाण विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.आर. पी. पी. पालशेतकर महाविद्यालय पालशेत येथे आपल्या शिक्षक सेवेला त्यांनी सुरुवात केली.एक मनमिळावू व विद्यार्थी वर्गामध्ये लोकप्रिय शिक्षक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती.दरम्यान काही वर्षांपूर्वी संस्थेकडून त्यांना वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे येथे बढती मिळाली होती.
मंगळवारी 22 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मावळली.तळवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने तळवली परिसरावर तसेच पालशेत परिसरावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी,आई,भाऊ भावजय असा मोठा परिवार आहे.त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दि.1 सप्टेंबर रोजी तळवली बागकर स्टॉप येथील स्मशानभूमीत होणार असून उत्तरकार्य रविवार दि.4 सप्टेंबर रोजी तळवली येथील निवासस्थानी होणार आहे.