वीज बिल भरा अन्यथा स्मार्ट मीटर बसवू

महावितरणची ग्राहकाला अजब धमकी

गुहागर प्रतिनिधी :
वीजपुरवठ्याच्या बाबतीत नेहमीच बोंब असलेल्या महावितरणने वीजग्राहकाला अजब धमकी देत आपल्या अनागोंदी कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आणला आहे. वीजग्राहकाला थकीत वीजबिल न भरल्यास स्मार्ट मीटर बसवू अशी अजब धमकी महावितरणकडून देण्यात आल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
गुहागर तालुक्यातील जानवळे येथील ग्राहक महेश जाधव यांनी मागील ऑगस्ट महिन्याचे वीजबिल भरणा केले नव्हते.यामुळे मागील महिन्याचे थकीत वीजबिल सप्टेंबर महिन्याच्या वीजबिलात वाढून आले.मात्र वीजबिल भरणा तारीख पुढे असताना देखील त्यापूर्वीच महावितरणकडून श्री जाधव यांना वीजबिल भरण्याबाबत विचारणा करण्यात आली.वीजबिल भरणा तारीख पुढे असल्याने दोन दिवसात आपण थकबाकीसह बिल भरणा करणार असल्याचे जाधव यांनी महावितरणला कळविले.मात्र तुम्ही त्वरित वीजबिल भरणा केला नाहीत तर आम्हाला स्मार्ट मीटर बसवावा लागेल अशी जणू जबरदस्तीची धमकीच महावितरण कडून देण्यात आली.
दरम्यान नियमित वीजबिल भरणा करत असताना देखील केवळ एक महिन्याचे थकीत बिल भरण्यास विलंब होत असल्याने आपल्याला धमकी आल्याचे महेश जाधव यांचे म्हणणे आहे.ज्यावेळी विद्युत पुरवठा खंडित होतो त्यावेळी हीच तत्परता महावितरण का दाखवत नाही असा सवालही महेश जाधव यांनी महावितरणला केला आहे.एकूणच महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे आता ग्राहकांधून संताप व्यक्त होत आहे.