१० नामांकित कंपन्यांचा सहभाग : संधी मिळालेल्यांमध्ये १८ महिला उमेदवारांचा समावेश.
वेंगुर्ले : दाजी नाईक
देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योग क्षेत्रातील अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ २०२६ – महाराष्ट्र’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत वेंगुर्ले येथे एकदिवसीय रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला.
डॉ. बाळासाहेब सावंत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, सुजाता पडवळ, भाजप तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, नगरपरिषद वेंगुर्ले बांधकाम सभापती प्रणव वायंगणकर, नगरसेवक सुधीर पालयेकर, डॉ. बाळासाहेब सावंत प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे संचालक वैभव शिंदे, खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्लेचे प्राचार्य डॉ. धनराज गोसावी, आयएमसी ऑफ आयटीआय वेंगुर्लेचे सदस्य सुधीर ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते वसंत तांडेल तसेच ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ २०२६ – महाराष्ट्र’चे समन्वयक जगदीश गवस उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश गवस यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक व सुजाता पडवळ यांनी उपस्थित उमेदवारांना रोजगाराबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन केले.
रोजगार मेळाव्यासाठी १० नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थित ७४ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी ४३ उमेदवारांची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली असून, निवड झालेल्यांमध्ये १८ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप धुरी, गणित तथा चित्रकला निदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) वेंगुर्ले यांनी केले. आभार प्रदर्शन नंदकुमार नरटवडेकर, शिल्पनिदेशक, आयटीआय वेंगुर्ले यांनी केले.
रोजगार महाकुंभाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ निदेशक प्रसाद कोंदे, शिल्पनिदेशक इलेक्ट्रिशियन तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेंगुर्लेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.












