सिंधुदुर्गातील ९ पारंपरिक दशावतार मंडळांचाही होणार सन्मान
वेंगुर्ले l दाजी नाईक :कलावलय तर्फे घेण्यात येणा-या एकांकिका स्पर्धेचे औचित्य साधून दिला जाणारा कै. राजीव शिंदे स्मृती कलावलय नाट्यगौरव पुरस्कार लेखक, दिग्दर्शक तथा ज्येष्ठ रंगकर्मी विजयकुमार फातर्पेकर यांना जाहीर झाला आहे. उद्या २ जानेवारी रोजी श्री.फातर्पेकर यांना हा पुरस्कार एकांकिका उद्घाटन प्रसंगी सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. तसेच याचवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्रातील नऊ पारंपरिक दशावतार मंडळांचाही सन्मान केला जाणार आहे.
कलावलयचे संस्थापक स्व. प्रा. शशिकांत यरनाळकर यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात यासाठी कलावलय तर्फे दरवर्षी एकांकिका स्पर्धा घेण्यात येतात. यावर्षीच्या एकांकिका स्पर्धा या २ जानेवारीपासून सुरू होत आहेत. या संस्थेतर्फे गेल्यावर्षी पासूनकै.राजीव शिंदे स्मृती कलावलय नाट्यगौरव पुरस्कार देण्यात येत आहे. लेखक, दिग्दर्शक तथा ज्येष्ठ रंगकर्मी विजयकुमार फातर्पेकर हे यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनानंतर या पुरस्कराचे वितरण केले जाईल. तसेच याचवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्रातील नऊ पारंपरिक दशावतार मंडळांचाही सन्मान होणार आहे. यामध्ये आरोलकर दशावतार, चेंदवणकर-गोरे दशावतार, आजगांवकर दशावतार, बाळकृष्ण गोरे दशावतार, नाईक मोचेमाडकर दशावतार, वालावलकर दशावतार, मामा मोचेमाडकर दशावतार, खानोलकर दशावतार आणि पार्सेकर दशावतार नाट्य मंडळांचा समावेश आहे. या सर्व मंडळांचा सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. तरी या कार्यक्रमाला आणि एकांकिका स्पर्धांना उपस्थित रहावे असे आवाहन कलावलयतर्फे केले आहे.
फोटो – विजकुमार फातर्पेकर.













