‘शाळेसाठी घेतलेली जागा जमीनमालकाला परत का?’
मनोज रावराणे, संदेश सावंत आक्रमक
लघुपाटबंधारेचा विषय पुढील सभेत ठेवण्याचा निर्णय
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत आचरे येथील उर्दू शाळेची इमारत व जागा संबंधित संस्थेला परत करण्याचा प्रस्ताव चांगलाच वादळी ठरला. शाळेसाठी संपादित केलेली जागा पुन्हा जमीनमालकाला परत का द्यायची? असा सवाल उपस्थित करत सदस्यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. मनोज रावराणे आणि संदेश उर्फ गोठ्या सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सभागृहाने हा विषय फेटाळून लावला.
छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, सभापती संतोष साठविलकर, अनुराधा नारकर, रुहिता तांबे आधी पदाधिकारी उपस्थित होते. या सभेसमोर एकूण १३ विषय ठेवण्यात आले होते. त्यामध्ये महिला व बालविकास, ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य, वित्त, सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, शिक्षण, बांधकाम आणि लघुपाटबंधारे विभागाशी संबंधित विविध विषयांचा समावेश होता.या सभागृहात पहिल्याच उपस्थित राहिलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अपूर्वा बासुर यांचे सभागृहाच्या वतीने स्वागत करण्यात आले,
विषय क्रमांक सातमध्ये ‘अंजुमन तरक्की व तन्जीम आचरे यांच्या नावे असलेली जि.प. शाळा आचरे उर्दू शाळेची इमारत व जागा परत करण्यास परवानगी’ देण्याचा प्रस्ताव होता. हा विषय सभागृहासमोर येताच सदस्यांनी त्याला विरोध केला.शाळेसाठी जागा घेतल्यानंतर ती पुन्हा जमीनमालकाला परत देण्याची गरज काय, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. आज उर्दू शाळेची जागा परत दिली, तर भविष्यात अन्य जिल्हा परिषद शाळांच्या जागाही जमीनमालकांना परत करणार का? असा प्रश्न मनोज रावराणे आणि संदेश उर्फ गोठ्या सावंत यांनी उपस्थित केला.शाळांच्या जागांबाबत भविष्यात चुकीचा पायंडा पडू शकतो, अशी भूमिका घेत सदस्यांनी प्रस्तावाला तीव्र विरोध केला. चर्चेदरम्यान वातावरण तापले आणि अखेर सभागृहाने हा प्रस्ताव फेटाळून लावण्याचा निर्णय घेतला.
लघुपाटबंधारेचा विषय पुढील सभेत
दरम्यान, लघुपाटबंधारे विभागाकडील स्थानिक निधी लेखापरीक्षण अहवाल २०२३-२४ च्या प्रथम पूर्तता अहवालाचा विषयही सभेसमोर होता. या विषयावर सदस्यांनी संबंधित कागदपत्रे व आवश्यक माहिती सभागृहासमोर पूर्णपणे ठेवण्याची मागणी केली.सर्व माहिती उपलब्ध करून पुढील सभेत हा विषय मंजुरीसाठी ठेवावा, असा निर्णय सभागृहाने घेतला. त्यामुळे या विषयावरील अंतिम मंजुरी पुढील सभेकडे ढकलण्यात आली.
सभेत जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातील १० टक्के सेसअंतर्गत महिला व बालविकास विभागातील पुनर्विनियोजनास सुधारित मान्यता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील योजनांसाठी पुनर्विनियोजन, आरोग्य विभागातील योजनांचे पुनर्विनियोजन, २०२५-२६ चे वार्षिक लेखे आणि एकत्रित वार्षिक प्रशासन अहवाल यासह विविध विषयांवर चर्चा झाली.
राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत जिल्हा पंचायत संसाधन केंद्राच्या इमारतीच्या सुधारित अंदाजपत्रकातील वाढीव खर्चाची तरतूद जिल्हा परिषद सेसमधून करण्याचा विषय, मालवण विश्रामगृहाच्या आवारातील मोकळी जागा छोट्या स्टॉलसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव, विविध अनुदानांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अल्प मुदतीसाठी केलेली गुंतवणूक आणि बांधकाम विभागातील कामांच्या मक्ता मंजुरीसंदर्भातील विषयही सभेसमोर होते.
तसेच ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रा’ योजना राबविण्यास मान्यता देण्याचा विषयही सभेच्या कामकाजात समाविष्ट होता. मात्र, आचरे उर्दू शाळेची जागा परत करण्याचा प्रस्ताव आणि लघुपाटबंधारे विभागाचा विषय या दोन मुद्द्यांवर सभागृहातील चर्चा विशेष लक्षवेधी ठरली.










