संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात अणसूर ग्रा.पं ची राज्यस्तरीय समितीकडून तपासणी..

राज्यस्तरीय स्पर्धेतही अणसूर ग्रामपंचायत चमकदार कामगिरी करेल : सरपंच सत्यविजय गावडे

वेंगुर्ले : दाजी नाईक
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२५-२६ अंतर्गत कोकण विभागस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी तपासणी अत्यंत उत्साही आणि सकारात्मक वातावरणात पार पडली.

या राज्यस्तरीय मूल्यमापन व तपासणीकरिता राज्यस्तरीय समितीतील मुख्य अधिकारी – सुगंधा पवार (अपर सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय), नेहा आंगणे (कक्ष अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग), प्रशांत म्हात्रे (कार्यकारी अभियंता, राज्य पाणी व स्वच्छता मिशन, बेलापूर) आणि स्मिता माने (सहाय्यक कक्ष अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई) हे विशेषत्वाने उपस्थित होते.

तपासणी समितीने ग्रामपंचायतीच्या अंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध स्वच्छता उपक्रमांची, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेची सखोल पाहणी केली. गावातील विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून समितीने अणसूर ग्रामपंचायतीने केलेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक केले.

या महत्त्वपूर्ण प्रसंगी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी सीईओ) अजिंक्य सावंत, स्वच्छता निरीक्षक मनीष पडते, संतोष पाटील, पंचायत समिती वेंगुर्ला कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, विस्तार अधिकारी पंचायत गुरुनाथ धुरी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अनुप वळवी, द्रौपती नाईक तसेच मुख्यसेविका मोरे मॅडम आदी उपस्थित होते.

तसेच उपसभापती सचिन देसाई अणसूर ग्रामपंचायतीचे सरपंच सत्यविजय गावडे, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रामपंचायत सदस्य सीमा गावडे, संयमी गावडे, साक्षी गावडे, प्रज्ञा गावडे, सुधाकर गावडे, वामन गावडे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, डाटा ऑपरेटर, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका, सीआरपी शीला देऊलकर, मानसी आंगचेकर, कृषी सखी, पशु सखी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी व बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व विभागांचा समन्वय आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यामुळे ही राज्यस्तरीय तपासणी अत्यंत सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडली. विभागस्तरीय यशानंतर आता राज्यस्तरीय स्पर्धेतही अणसूर ग्रामपंचायत चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास यावेळी सरपंच सत्यविजय गावडे व ग्रामस्थांनी व्यक्त केला.