विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या सोहम देशमुखची दमदार कामगिरी

सावंतवाडी :
येथील विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या इयत्ता ८ वी तील विद्यार्थी कु. सोहम देशमुख याने उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप पाडली आहे. एकूण ४० खेळाडूंच्या सहभागात पार पडलेल्या या स्पर्धेत सोहमने स्वतःपेक्षा मोठ्या वयोगटात खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
​या स्पर्धेतील एकूण सहा सामन्यांपैकी सोहमने ३.५ गुणांची कमाई करत अंतिम क्रमवारीत ११ वा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, दरवर्षी १४ वर्षे वयोगटात खेळणाऱ्या सोहमने यावर्षी १७ वर्षे वयोगटात खेळण्याचे मोठे आव्हान स्वीकारले होते. स्वतःपेक्षा अधिक वयाच्या आणि अनुभवी खेळाडूंशी सामना करतानाही त्याने अत्यंत आत्मविश्वासाने व कौशल्याने पटकावलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद ठरले आहे.
​सोहमची बुद्धिबळातील जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पाहता भविष्यात तो शाळेचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच उज्ज्वल करेल, असा विश्वास त्याच्या पालकांनी व शिक्षकांनी व्यक्त केला. सोहमच्या या चमकदार कामगिरीबद्दल शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.