वन्यजीव सप्ताहानिमित्त देवरुख येथे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संरक्षणाचा जागर

देवरूख (प्रतिनिधी):

दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान साजरा होणाऱ्या वन्यजीव सप्ताहानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख येथे आज जनजागृतीपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. परिमंडळ वन अधिकारी, संगमेश्वर-देवरुख यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मा. कोकणी सर व सहाय्यक शिक्षक, मानद वन्यजीव रक्षक श्री. प्रतीक मोरे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन मा. शेटे सर, सामाजिक कार्यकर्ते श्री. यूयुत्सू आर्ते, सामाजिक कार्यकर्त्या कदम मॅडम, परिमंडळ वन अधिकारी कार्यालय व सामाजिक वनीकरण, देवरुख चे कर्मचारी, सह्याद्री निसर्ग सोसायटीचे पदाधिकारी व सुमारे २५० विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. यूयुत्सू आर्ते यांनी “वन्यप्राणी व वनसंवर्धन ही काळाची गरज आहे” यावर प्रकाश टाकत, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण किती महत्त्वाचे आहे हे सोप्या उदाहरणातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

त्यानंतर मानद वन्यजीव रक्षक श्री. प्रतीक मोरे यांनी मानव-वन्यजीव संघर्षाची सद्यस्थिती, त्याची कारणे आणि वन्यप्राणी आढळल्यास घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबत चित्रफितींच्या माध्यमातून अत्यंत ओघवत्या भाषेत मार्गदर्शन केले. जंगल हे प्राण्यांचे घर आहे, आपण त्यांच्या अधिवासात अतिक्रमण करू नये, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी देखील प्रश्नोत्तरे करून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.