पहिलाच शो हाऊसफुल
आचरा-अर्जुन बापर्डेकर :
मालवण तालुक्यातील त्रिंबक या गावचे सुपुत्र असलेल्या मनोज नाईक साटम यांनी लेखन दिग्दर्शन केलेला गमन हा कोकणातील स्थलांतराचे वास्तव्य दाखवणारा भावस्पर्शी चित्रपट दोन ऑक्टोबर पासून कणकवली येथील लक्ष्मी चित्रमंदिर सह राज्यातील अनेक चित्रपट गृहात प्रदर्शित झाला.कणकवली येथे कलाकारांच्या उपस्थितीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत पहिलाच शो हाऊसफुल्ल झाला.
कधीकाळी ज्या घरांच्या अंगणात माणसांची गर्दी असायची, प्राथमिक शाळांमध्ये मुले ओसंडून वाहायची.
तिथे आज शांतता आहे.शाळांची पटसंख्या घसरत चालली आहे.रोजगाराच्या शोधात झालेल्या स्थलांतरामुळे कोकणातील गावागावांतील घरं ओस पडत गेली. पुर्वी अकरा दिवस रंगणारा गणेशोत्सवही अवघ्या दिड दिवसाचा होणार की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे.
याच सामाजिक वास्तवाला माणसांच्या भावविश्वातून दिग्दर्शक मनोज नाईक साटम यांनी गमन द्वारे
पडद्यावर मांडले आहे.
लेखक-दिग्दर्शक मनोज नाईक साटम यांनी या चित्रपटातून कोकणातील स्थलांतर, रिकामी होत चाललेली गावं आणि नात्यांची वीण या संवेदनशील विषयाला हात घातला आहे.
कोकणातील एका गावात राहणारे वृद्ध दांपत्य भाऊ आणि माई किरकोळ वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत आपल्या मुलांकडे येतात. गावच्या मोकळ्या वातावरणात जगलेल्या या दांपत्याला शहरातील धावपळीशी जुळवून घेणे कठीण जाते. त्याच काळात उत्तर प्रदेशातील पुरामुळे घर गमावलेले कुंदन आणि तारा हे बहीण-भाऊ रोजगाराच्या शोधात मुंबईत येतात. गणेशोत्सवासाठी भाऊ-माई गावाकडे परतण्याचा निर्णय घेतात आणि कुंदन-तारा त्यांच्यासोबत गावात जातात..पुढे घडणाऱ्या भावनिक प्रवासातून मुंबईला पुढे परदेशात व्यवसाय रोजगारात गुंतलेल्या चाकरमान्यांचि कमी होणारि गावाची ओढ यातूनच बंद घरांमागचे वास्तव्य या चित्रपटातून समोर येत आहे.या चित्रपटाबद्दल बोलताना लेखक दिग्दर्शक मनोज नाईक साटम सांगतात
मी नेहमीच माझ्या मातीची कथा सांगू इच्छित होतो. या चित्रपटातून गाव आणि शहर यांच्यातील अंतर, तसेच मानवमूल्यांचे महत्त्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही खरोखरच स्थानिक कलाकार आणि स्थानिक लोकांच्या सहभागाने हा चित्रपट बनवला आहे.या चित्रपटाची निर्मिती मानसी नाईक साटम यांनी केली असून
लेखन व दिग्दर्शन मनोज नाईक साटम यांनी केले आहे.या चित्रपटात नारायण जाधव, श्रद्धा खनोलकर, दीपक कुमार, हर्षिका मेलेकर, सचिन वळंजू, यांसह
निलेश भेरे, निलेश पवार, गणेश मांजरेकर, मानसी नाईक साटम, केदार गोडसे, आकांक्षा खोत, निकिता सावंत, प्रदीप वेलोंडे आदी कलाकारांनी हृदयस्पर्शी अभिनय केला आहे.या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर रोहन पारकर असून
छायांकन शैलेश तांबे,संकलन सौरभ नामदेव नाईक,संगीत प्रशांत कांबळे यांचे आहे.हा चित्रपट यापूर्वीच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF २०२६) मधील मराठी चित्रपट स्पर्धा विभागासाठी निवडला गेला असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये त्याला कौतुकाची थाप मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्रांने बनवलेला या चित्रपटाला जिल्हावासियांनी भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन लेखक दिग्दर्शक मिलिंद नाईक साटम यांनी केले आहे.













