सावंतवाडी :
सावंतवाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रवक्ता तथा सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांचे बुधवारी सकाळी गोवा बांबोळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांच्या निधनामुळे सावंतवाडीच्या राजकीय, सामाजिक आणि युवा क्षेत्रात मोठी शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर गोव्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी आमदार तथा शिवसेना नेते परशुराम उपरकर यांचे ते अत्यंत विश्वासू आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून परिचित होते.
पक्षसंघटनेप्रती निष्ठा आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध राखणारे आशिष सुभेदार यांनी मनसेपासून पुढे ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातील अनेक सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यांच्या अकाली निधनाने सावंतवाडीने एक उमदा युवा कार्यकर्ता गमावला असून, त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.












