देवरूख पोलीस ठाण्याच्या देवरूखच्या राजाला भव्य पारंपारिक विसर्जन मिरवणुकीने भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप

विसर्जन मिरवणुकीत साक्षात पंढरी अवतरल्याचा अनुभव; डिजेमुक्त विसर्जन मिरवणुकीचा देवरूख पोलीसांचा आदर्शवत निर्णय
भव्य पारंपारिक विसर्जन मिरवणुकीने देवरूखवासिय भारावले

देवरूख (प्रतिनिधी):

देवरूख पोलीस ठाण्याच्या २१ दिवसांच्या देवरूखच्या राजाला भव्य पारंपारिक विसर्जन मिरवणुकीने काल रविवारी रात्री भक्तीमय वातावरणात सप्तलिंगी नदीपात्रात भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे. या विसर्जन मिरवणुकीत साक्षात पंढरी अवतरल्याचा अनुभव आला. त्यामुळे देवरूखच्या भक्तिमय वातावरणाला आध्यात्मिक रंग आल्याचे पहावयास मिळाले. या पारंपरिक विसर्जन मिरवणुकीने समस्त देवरूखवासिय अक्षरशः भारावून गेले.

देवरूख पोलीस ठाण्याच्या देवरूखचा राजा पोलीस बाँईज मित्रमंडळातर्फे हनुमान मंदिरात २१ दिवसांच्या गणरायाची दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या २१ दिवसांच्या कालावधीत बाप्पाची भक्तीभावे सेवा करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावर्षी डिजेमुक्त विसर्जन मिरवणुकीने गणरायाला निरोप देण्याचा कौतुकास्पद निर्णय देवरूख पोलीसांमार्फत घेण्यात आला. त्यामुळे यावर्षी पारंपारिक विसर्जन काढण्यात आली. यामध्ये पांडुरंगाची आकर्षक प्रतिकृती, टाळ-मृदंगाच्या गजरात रंगलेले भजन, भक्तिरसात तल्लीन करणारे वारकरी नृत्य आणि शिवकालीन परंपरेची आठवण करून देणारी साहसी खेळांची थरारक प्रात्यक्षिके यामुळे संपूर्ण वातावरण भक्ती, संस्कृती आणि शौर्याने भारून गेले.

या विसर्जन मिरवणुकीत ‘विठ्ठल-विठ्ठल’चा जयघोष, गणपती बाप्पा मोरया’चा गजर करण्यात आला. तर शिवकालीन साहसी खेळांचे दर्शन घडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी आणि गाण्यांनी देवरुखनगरी अक्षरशः दुमदुमून गेली. परंपरा, भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडवणारी ही मिरवणूक देवरूखच्या सांस्कृतिक वैभवाची झलक ठरली. या मिरवणुकीत देवरूख पोलीसांसह त्यांचे कुटुंब व गणेशभक्त सहभागी झाले होते. यावर्षीची ही विसर्जन मिरवणूक दरवर्षीपेक्षा वेगळी ठरली. ही विसर्जन मिरवणूक हनुमान मंदिर, ग्रामीण रूग्णालय, स्टेट बँक रोड, बसस्थानक, बाजारपेठ, खालची आळी मार्गे मच्छीमार्केटपर्यंत काढण्यात आली. यानंतर सप्तिलिंगी नदीपात्रात रात्री या गणरायाचे गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या. या जयघोषात भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.