खासदार, पालकमंत्री, आमदार यांचा अभिनंदन ठराव!

मालवण पंचायत समिती सभा : विविध विषयावर सकारात्मक चर्चा : आमदार निलेश राणे यांच्या कार्याचा विशेष गौरव

मालवण (प्रतिनिधी) : दुष्काळी परिस्थितीच्या ट्रिगर १ मध्ये मालवण तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा समावेश करून घेतल्याबद्दल खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मालवण पंचायत समिती सभेत पस सदस्या सीमा परुळेकर यांनी मांडला. सदस्य संतोष गावडे, दिपक चव्हाण यांच्या अनुमोदन सह सर्वानुमते ठराव घेण्यात आला.

आमदार निलेश राणे यांच्या कार्याचाही गौरव यावेळी करण्यात आला. आमदार निलेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. शेतीचे सरसकट पंचनामे झाले पाहिजेत यासाठी आग्रही भूमिका प्रशासन स्तरावर मांडून प्रशासकीय यंत्रणा गतिमान करत आहेत. तसेच भविष्यातील पाणीटंचाई तीव्रता कमी व्हावी या दृष्टीने उपाययोजनांवर विशेष भर देत आहेत. याच धर्तीवर वराड तलावाची ही पाहणी करून गाळ उपसा व अन्य उपाययोजनांसाठी अहवाल तयार करण्याचे निर्देश त्यांनी तहसीलदार यांना दिले आहेत. तलावाची पाणी साठवण क्षमता वाढावी. परिसरातील भुजल साठे वाढावेत यासाठी व्हिजन ठेवून आमदार निलेश राणे काम करतं आहेत. असे सांगत पस पस सदस्यां माधुरी मसुरकर यांनी अभिनंदन ठराव मांडला. याला दिपक चव्हाण यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.

मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. पांडुरंग सावंत, पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, छोटू ठाकूर, दिपक सुर्वे, सीमा परुळेकर, मानसी भोगावकर, रिया बावकर, माधुरी मसुरकर, संतोष गावडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी दीपक चव्हाण यांनी बेळणे मार्गावर तसेच परिसरात होत असलेल्या भूमिगत वीज वाहिनीच्या कामावर अनेक प्रश्न उपस्थित केले. भूमिगत वीजवाहिनीचे काम नियोजित आराखड्यानुसार झाले पाहिजे तसेच नियमानुसार काम होत आहे याची खात्री अधिकाऱ्यानी वेळोवेळी करत राहावी. काम दर्जेदार झाले पाहिजे. वारंवार सभेत प्रश्न उपस्थित करूनही अधिकाऱ्यांकडून योग्य पद्धतीने कार्यवाही होत नसल्याचेही दीपक चव्हाण यांनी सांगितले. याबाबत आमदार निलेश राणे यांचेही लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभापती प्रज्ञा चव्हाण यांनीही भूमिगत वीज वाहिनीचे काम दर्जेदार झाले पाहिजे अशा सूचना वीज अधिकाऱ्यांना दिल्या. या चर्चेत सदस्य छोटू ठाकूर संतोष गावडे, दीपक सुर्वे व अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.

या बैठकीत दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत प्रशासनाकडून माहिती घेत चर्चा करण्यात आली. दुष्काळी स्थितीचे सर्वांनी गांभीर्य ओळखून दुष्काळ निवारण करण्यासाठी काम करावे अशा सूचना सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी गावागावात दिलेल्या उद्दिष्टानुसार वनराई बंधारे बांधण्यात यावेत, यासाठी सर्वांनी श्रमदान करावे, प्रशासनाने ज्या बंधाऱ्यांची दुरुस्ती आवश्यक आहे तेथे दुरुस्ती करावी, असेही सौ. प्रज्ञा चव्हाण यांनी सांगितले. तोंडवळी तळाशील येथे आतापासून विहिरीचे पाणी खारे होतं आहे. त्यामुळे येथे उपाययोजना प्रधान्याने घ्याव्यात अश्या सूचना सदस्य गणेश तोंडवळकर यांनी केल्याचे दिपक चव्हाण यांनी सांगितले. मसुरे परिसरातील काही बंधाऱ्यांच्या फळ्या वाहून गेल्यामुळे खारेपाणी शेतात घुसून मोठे नुकसान होत आहे या बंधाऱ्यांची दुरुस्ती तात्काळ केली जावी अशी भूमिका छोटू ठाकूर यांनी मांडली.

चिंदर तलाव परिसरात तीन किलोमीटर लांब वहाळमध्ये मोठया प्रमाणात गाळ आहे. हा गाळ उपसा झाल्यास चिंदर, आचरा, पळसंब, त्रिंबक या गावांना पाणी साठा दृष्टीने हा तलाव महत्वाचा ठरेल. तरी उपाययोजना कराव्यात असे दिपक सुर्वे यांनी सांगितले. कुडोपी येथील जीर्ण बंधारा दुरुस्ती करण्यात यावी अशीही सूचना सुर्वे यांनी मांडली. तालुक्यातील रिक्त शिक्षक व शिक्षण विभागासंबंधित प्रश्नावर चर्चा झाली. संतोष गावडे, माधुरी मसुरकर, दिपक चव्हाण, छोटू ठाकूर यांनी चर्चेत सहभाग घेतला.