शासकीय योजनांविषयी प्रबोधन
चिपळूण (प्रतिनिधी) : एकात्मिक बालविकास सेवा योजना चिपळूण-१ (दादर-२ बीट) अंतर्गत अलोरे येथे ९ वा राष्ट्रीय पोषण माह आणि ‘सेवा संकल्प अभियान’ विविध उपक्रमांसह उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच आयसीडीएस (ICDS) स्थापना दिनाचे औचित्य साधून महिला व बालकांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने ‘लेक लाडकी योजना’, ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ आणि नवजात बालकांसाठीच्या ‘बेबी केअर किट’ वाटपाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. सुदृढ आरोग्यासाठी आहाराचे महत्त्व पटवून देताना पोषणयुक्त पाककृती प्रदर्शन, आकर्षक रांगोळी प्रदर्शन आणि पोषणविषयक जनजागृतीपर गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. या माध्यमातून दैनंदिन आहारात स्थानिक व पौष्टिक घटकांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. विनया झगडे, पंचायत समितीचे माजी सदस्य विनोद झगडे, बीट पर्यवेक्षिका मनीषा चिपळूणकर, आरोग्य विभागाचे समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) श्री. होळकर, आरोग्य सेविका श्रीमती म्हाप्दी, शिक्षक श्री. गुडूकडे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, माता पालक, किशोरी मुली व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












