राजापूर नगर वाचनालयाचे ‘उत्तम वाचक पुरस्कार’ जाहीर

१५ ऑक्टोबर रोजी डॉ. प्रशांत पटवर्धन यांच्या हस्ते वितरण
वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘नवनिर्मितीचे ऋषी- परशुराम’ या विषयावर होणार व्याख्यान

राजापूर (वार्ताहर): वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी १५० वर्षांहुन वर्षांहून अधिक काळ अविरत कार्यरत असणाऱ्या येथील राजापूर नगर वाचनालयाचे सन २०२५-२६ या वर्षाचे साठीचे कै. सावित्री केरू गोंडाळ स्मृती, ‘उत्तम वाचक पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.

यंदाचा सर्वोत्कृष्ट वाचक पुरुष पुरस्कार डॉ. श्रीकांत जयकृष्ण मलातपुरे यांना, तर सर्वोत्कृष्ट वाचक महिला पुरस्कार श्रीमती सोनी एडके यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने राजापूर नगर वाचनालयाने यंदापासून ‘उत्तम बालवाचक पुरस्कार’ सुरू केला आहे. वाचनालयाचा नियमित बालवाचक चि. प्रणव संतोष मोंडे याला हा पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे.

कै. सावित्री केरू गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार कै. बी.के. गोंडाळ आणि सौ. मानसी हजेरी यांनी दिलेल्या रकमेतून नगर वाचनालयामार्फत दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम असे आहे. तर उत्तम बाल वाचक पुरस्कार हा नव्याने नगर वाचनालयाने सुरू केला आहे. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता वाचनालयाच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूण येथील प्रसिद्ध लेखक, ज्येष्ठ पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक डॉ. प्रशांत पटवर्धन उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात येईल. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर डॉ. पटवर्धन यांचे ‘नवनिर्मितीचे ऋ षी – परशुराम’ या विषयावर अत्यंत मौलिक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
राजापूर नगर वाचनालय या संस्थेने काळाच्या प्रवाहात वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्यापैकीच एक असलेला ‘उत्तम वाचक पुरस्कार’ हा उपक्रम वाचनालयाशी जोडलेल्या पिढ्यांचा गौरव करणारा आणि नव्या पिढीला वाचनाची प्रेरणा देणारा ठरला आहे.

संस्थेचे अध्यक्ष प्रभात पाध्ये, कार्यवाह जयंत अभ्यंकर आणि संचालक मंडळाने सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. या कार्यक्रमाला आणि व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी राजापूरमधील सर्व आबालवृद्ध, वाचकप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजापूर नगर वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.