लोरे येथे सलग दुसऱ्या दिवशी चक्रीवादळाचा तडाखा : पाच घरांचे नुकसान

झाडे कोसळल्याने फोंडा – वैभववाडी मार्ग बंद : वीजपुरवठाही खंडित

वैभववाडी | प्रतिनिधी :
सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळी लोरे परिसराला जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह चक्रीवादळाचा तडाखा बसला. सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळामुळे परिसरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळली. फोंडा-वैभववाडी मार्गासह अंतर्गत रस्त्यांवर सुमारे सात ते आठ ठिकाणी झाडे पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. ग्रामस्थांनी तत्काळ रस्त्यावर पडलेली झाडे हटवून वाहतूक पूर्ववत केली.

वादळाच्या तडाख्यात घरांवर झाडे पडल्याने मोतीराम पुंडलिक सुतार, प्रणय प्रवीण रावराणे, प्रकाश गुरव आणि आनंदी सुतार यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी घरांची छपरे व पत्रे उडाल्याने नुकसान झाले असून, गोठ्यांनाही वादळाचा फटका बसला आहे. यामुळे नुकसानीची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येत आहे.

मंगळवारी दुपारनंतर लोरे परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.

दरम्यान, लोरे परिसरात वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळताच तहसीलदार सूर्यकांत पाटील महसूल पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नुकसानीची प्राथमिक पाहणी केली. सायंकाळी अंधार झाल्याने नुकसानीचे सविस्तर पंचनामे करता आले नाहीत. त्यामुळे महसूल यंत्रणेला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, पंचनाम्यानंतर नुकसानीची नेमकी व्याप्ती स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यात आल्याने सध्या वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. मात्र, वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा अद्याप खंडित असल्याची माहिती आहे.