राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक तालुका अध्यक्षपदी साईराज सावंत

मंडणगड प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंडणगड युवक तालुका अध्यक्षपदी साईराज सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी मंडणगड तालुक्याच्या आढावा दौऱ्यादरम्यान साईराज सावंत यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले.
मंडणगड नगरपंचायतीच्या सभागृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सावंत यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पक्षाचे मावळते युवक तालुकाध्यक्ष लुकमान चिखलकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.
साईराज सावंत हे मंडणगड गांधी चौक परिसरातील कार्यकर्ते असून, कष्ट व संघर्षातून त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. समाजातील विविध घटकांशी त्यांचा थेट संपर्क व जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, शहराध्यक्ष वैभव कोकाटे, नगराध्यक्षा सोनल बेर्डे, दिनेश लेंडे, हरेश मर्चंडे, रमेश दळवी आदी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साईराज सावंत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
युवकांमध्ये पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणार : साईराज सावंत
नियुक्तीनंतर साईराज सावंत यांनी, पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी तसेच पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितले.