हातभट्टीची दारू तयार करणाऱ्यावर छापा; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

शिळ-कदमवाडीतील येथे २,८०० लिटर कुजके रसायनासह दारूसाठा ताब्यात

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरालगतच्या शिळ-कदमवाडी येथील नदीकिनारी जंगलमय भागात हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गुळ-नवसागर मिश्रित कुजके रसायन, तयार दारू तसेच हातभट्टीचे साहित्य असा एकूण १ लाख ९२ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सुनील सुरेश आग्रे (३८, रा. आग्रेवाडी, करबुडे, ता. जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई मंगळवार 6सप्टेंबर रोजी सकाळी 9 वा. सुमारास शिळ-कदमवाडी येथील नदीकिनारी असलेल्या झाडाझुडपांनी व्यापलेल्या जंगलमय परिसरात करण्यात आली. संशयित सुनील आग्रे हा गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी साहित्य व रसायने बाळगून असताना सापडला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी २०० लिटर क्षमतेचे एक पत्र्याचे बॅरल जप्त केले. या बॅरलच्या वरच्या बाजूस ॲल्युमिनियमची डेक बसविण्यात आली होती. दारू गाळण्यासाठी या डेकला काळ्या रंगाची प्लास्टिकची पाइप जोडण्यात आली होती. बॅरलच्या आत लाकडी चाटूच्या साहाय्याने व्यवस्था करण्यात आल्याचेही आढळले. या बॅरलमध्ये सुमारे १०० लिटर गुळ-नवसागर मिश्रित गरम कुजके रसायन असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.तसेच १५ पत्र्यांची व प्लास्टिकची बॅरल प्रत्येकी सुमारे २०० लिटर क्षमतेची आढळून आली. त्यामध्ये एकूण सुमारे २ हजार ८०० लिटर गुळ-नवसागर मिश्रित कुजके रसायन हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी ठेवण्यात आले होते. याशिवाय तयार केलेली गावठी हातभट्टीची दारू प्लास्टिकच्या कॅनमध्ये साठवून ठेवण्यात आली होती.
कारवाईत २० लिटर क्षमतेच्या पांढऱ्या रंगाच्या आठ प्लास्टिक कॅन जप्त केले. त्यामध्ये सुमारे १६० लिटर गावठी हातभट्टीची दारू तयार करून ठेवण्यात आली होती. तसेच दोन पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक कॅनमध्ये सुमारे ४० लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. या दारूसाठ्यासह हातभट्टी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये एक गोलाकार आकाराची अॅल्युमिनियमची डेक, जुनी वापरलेली असल्याचे नमूद केलेली भांडी, लाकडी चाटू आणि स्टीलची नळी यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या रसायन, दारू आणि हातभट्टीसाठी लागणाऱ्या साहित्याची एकूण किंमत १ लाख ९२ हजार २०० रुपये असल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.