खेड (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच कोल्हापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग)च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली.
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचालित या प्रशालेतील इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेणारे झेद जावेद परदेसी, देवेश मंगेश राऊत आणि आसीम झमीर चौगुले यांनी विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत झेद जावेद परदेसी याने दमदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले असून त्याने द्वितीय क्रमांक मिळविला. देवेश मंगेश राऊत आणि आसीम झमीर चौगुले यांनीही आपल्या कौशल्याची छाप पाडत कांस्यपदक मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशामुळे ज्ञानदीप विद्या मंदिरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्यपूर्ण सराव तसेच क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिन्ही खेळाडू, त्यांचे पालक, पर्यवेक्षक तसेच क्रीडा शिक्षक संतोष भोसले यांचे संस्था आणि प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर व भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे तसेच सल्लागार मंडळातील सदस्यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विभागीय स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून भविष्यातील उच्चस्तरीय स्पर्धांमध्येही ते उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.












