लांजा (प्रतिनिधी) : येथील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयाच्या कौन्सिलिंग अँड प्लेसमेंट सेलतर्फे रिटेल कंपनी ‘डी-मार्ट’ साठी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते .या कॅम्पस ड्राईव्हमध्ये महाविद्यालयातील तसेच परिसरातील इतर महाविद्यालयातील एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, ज्यापैकी २९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
या कॅम्पस ड्राईव्हचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, सचिव महेश सप्रे, सहसचिव राजेश शेट्ये, संचालक महम्मद रखांगी, संचालक संजय तेंडुलकर,
प्राचार्या डॉ सुवर्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्या डॉ सुवर्णा पाटील यांनी “विद्यार्थ्यांना रोजगाराचे थेट व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि स्वावलंबी बनवणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे” असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी निवड प्रक्रियेत डी-मार्ट कंपनीचे प्रतिनिधी सिद्धेश डोळस(सर्कल हेड- HR), विक्रांत पांडे(ऑपरेशन मॅनेजर) व वैभव कदम (HR- पुणे विभाग) यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारे मुंबई आणि पुणे येथील डी-मार्ट शाखांसाठी ‘ट्रेनी ऑफिसर’, ‘पिकर’, ‘अकाऊंटंट’ आणि HR या विविध पदांवर निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व २९ विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य व प्राध्यापक वर्गाकडून अभिनंदन करण्यात आले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व संस्थेचे सल्लागार शैलेश डोळस यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच कौन्सिलिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ रंजन खातू, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डॉ महेश बावधनकर यांनी तर आभार सौ प्रीती भिडे यांनी मानले.














