खेड (प्रतिनिधी) : ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या ‘महाराजा प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन संस्थे’चा सन्मान ‘साथी महिला सामाजिक विकास संस्था, खेड’ यांच्या वतीने करण्यात आला. सन्मानचिन्ह देऊन संस्थेच्या कार्याची दखल घेत गौरव करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक व दुर्ग अभ्यासक उत्तमकुमार जैन यांनी सन्मान स्वीकारला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था गडकिल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता मोहीम, जनजागृती आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव प्रणव मापुस्कर, सदस्य एस. डी. शिर्के, अजय चव्हाण, तसेच दुर्ग सेवक वैभव सागवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेश कदम यांच्या पत्नी सौ. श्रेयाताई योगेश कदम तसेच खेडच्या नगराध्यक्ष सौ. माधवीताई बुटाला यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
उपस्थित मान्यवरांनी गडकिल्ल्यांचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करत अशा उपक्रमांना समाजाने अधिकाधिक पाठिंबा देण्याचे आवाहन केले. या सन्मानामुळे संस्थेच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून भविष्यातही गडकिल्ल्यांच्या जतनासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.











