चिपळूण तालुक्यात नववा ‘राष्ट्रीय पोषण माह’ व ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात

 पौष्टिक पाककृती व रांगोळ्यांचे लक्षवेधी प्रदर्शन
 उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा गौरव
 विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप
चिपळूण (प्रतिनिधी) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चिपळूण यांच्यावतीने नववा ‘राष्ट्रीय पोषण माह’ आणि ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमातून सुदृढ आरोग्य, योग्य पोषण आणि महिला-बाल सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रमुख मार्गदर्शन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी बालक, किशोरवयीन मुली आणि गरोदर व स्तनदा माता यांच्या योग्य पोषणाचे व आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले; तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. सहाय्यक गटविकास अधिकारी केळसकर यांनीही उपस्थितांना आरोग्य व प्रशासकीय सहकार्याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य नेहा रहाटे, पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, पंचायत समिती सदस्य श्री शिगवण, पंचायत समिती सदस्य स्नेहा साळवी आणि पंचायत समिती सदस्य मेघा इंगवले उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या तळागाळातील कार्याची प्रशंसा केली. या उपक्रमांतर्गत पोषण आहारापासून बनवण्यात येणाऱ्या विविध पौष्टिक पाककृतींचे प्रदर्शन आणि पोषणविषयक संदेश देणाऱ्या सुबक रांगोळ्यांचे प्रात्यक्षिक मांडण्यात आले होते, ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. सोबतच जनजागृतीपर सांस्कृतिक प्रबोधनाचे कार्यक्रम पार पडले.
कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘लेक लाडकी योजना’ आणि ‘प्रधानमंत्री मातृ वंदन योजना’ यांमधील पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी श्रीमती शिवगण यांनी मांडून पोषण माह मोहिमेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. याप्रसंगी तालुकयातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, प्रकल्प कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय प्रेरणादायी व उत्साही वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.